जयसिंगपूर / प्रतिनिधी
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनतेसह पशुधनाचे मोठे नुकसान झाले असताना,दक्षिण भारत जैन सभेने मदतीचा हात पुढे करत पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपली आहे. पूरग्रस्तांना चारा व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करून तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीस अकरा लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन सभेने मानवी सेवेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील आणि शिरोळचे आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सभेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाखांचा धनादेश सुपूर्द केला.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,राज्यावर नैसर्गिक आपत्ती ओढावली की दक्षिण भारत जैन सभा नेहमीच मदतीसाठी पुढे येते.शासनाच्या वतीने मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे.या प्रसंगी सभेच्या वतीने पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणीदरम्यान श्री विठ्ठल मंदिराच्या परिसरातील सुमारे ३०० ते ३५० वर्षे जुन्या भ. पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर तसेच त्यागी व भक्त निवास यांच्या इमारतींचे पावित्र्य आणि अस्तित्व अबाधित ठेवावे,रस्ता रुंदीकरणाच्या कामात त्यांना धक्का लागू नये,अशी विनंती मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली.पंढरपूर विकास आराखडा राबविताना जैन मंदिरास कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही.संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.या भेटीच्या वेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष रविंद्र माणगावेही उपस्थित होते. दक्षिण भारत जैन सभेच्या या उपक्रमामुळे पूरग्रस्त जनतेला दिलासा मिळाला असून, समाजसेवेचा हा आदर्श उपक्रम इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.