तमदलगेजवळ ऊस वाहतूक रोखली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

Spread the love

प्रतिनिधी / चिपरी

चिपरी येथील यड्रावकर यांच्या खांडसरी कारखान्याने मागील हंगामाचा कोणताही ऊस दर जाहीर न करता यावर्षी केवळ ३३०० रुपये दर जाहीर केला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी ३७५१ रुपये असून, कारखान्याची घोषित एफआरपी ३४७५ रुपयांवर बसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.आज कोल्हापूर रोडवरील तमदलगे जवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरना अडवून परत पाठवण्यात आले.यावेळी शेतकऱ्यांनी कारखान्याने तात्काळ योग्य दर जाहीर करण्याची मागणी करत जोरदार घोषणा दिल्या.सचिन शिंदे म्हणाले, “स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे नुकसान करण्याचा हेतू नाही.मात्र कारखानदारांच्या बाजूने उभे राहून ऊस उत्पादकांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या कृतींमध्ये सहभागी होणार असाल, तर त्यातून होणाऱ्या नुकसानीसाठी स्वाभिमानी जबाबदार राहणार नाही.शिंदे यांनी पुढे सांगितले की, “यड्रावकर यांच्या कारखान्याने शेतकऱ्यांशी न्याय करावा, मागील हंगामाचा दर जाहीर करावा आणि यंदाच्या हंगामासाठी किमान ३७५१ रुपये दर लागू करावा.अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाचा तीव्र मार्ग अवलंबेल.या घटनेमुळे परिसरात ऊस वाहतुकीबाबत तणाव निर्माण झाला असून पोलिस प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य दर जाहीर करण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!