प्रतिनिधी – इचलकरंजी
इचलकरंजी-कबनूर रोडवरील पेट्रोल पंपासमोर मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकाची दगडाने डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.मृत युवकाचे नाव अभिनंदन कोल्हापूरे (रा. इचलकरंजी) असे असून, ते एका खाजगी बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते.या घटनेमुळे कबनूर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.प्राथमिक माहितीनुसार,रात्री सुमारे बारा वाजताच्या सुमारास अभिनंदन यांना कोणीतरी घराबाहेर बोलावून नेले.त्यानंतर पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या डोक्यात मोठ्या दगडाने प्रहार करून त्यांची हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी इचलकरंजी रुग्णालयात हलवला.हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. काही संशयित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांत जयसिंगपूर, उदगाव आणि दानवाड परिसरात तीन वेगवेगळ्या हत्या झाल्या असून, आता इचलकरंजीत पुन्हा एक हत्या झाल्याने कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. वाढत्या हत्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा गंभीरपणे तपास सुरू केला असून, लवकरच आरोपींचा शोध लावला जाईल, असे आश्वासन पोलीस सूत्रांनी दिले आहे.”