मागील हंगामाचा दुसरा हप्ता न देता ऊस गाळप सुरू करणाऱ्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या चिपरी येथील खांडसरी कारखान्यावर आज आंदोलन अंकुश संघटनेने तीव्र आंदोलन छेडले.संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याचे गेट बंद करून गाळप बंद पाडले. शिरोळ येथे झालेल्या एल्गार सभेत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार हे आंदोलन करण्यात आले.आज सकाळी आंदोलन अंकुश संघटनेचे कार्यकर्ते चिपरी येथे मोठ्या संख्येने एकत्र आले.त्यांनी कारखान्याच्या गेटवर धडक मारत घोषणाबाजी केली.तत्पूर्वी कारखान्याकडे येणारी ऊस वाहने अडवून परत पाठवण्यात आली.त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.वाहन अडवल्याने पोलिस आणि आंदोलक यांच्यात किरकोळ वादावादीही झाली.मात्र आंदोलक ठाम राहून त्यांनी कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला.संघटनेचे नेते धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले की, “मागील हंगामातील ऊसदराचा दुसरा हप्ता अद्याप दिला गेलेला नाही.जोपर्यंत शेतकऱ्यांचे थकबाकी पैसे मिळत नाहीत,तोपर्यंत हे गेटबंद आंदोलन सुरूच राहील.” त्यांनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात येत आहे.या आंदोलनामुळे परिसरात ऊस आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यावेळी राकेश जगदाळे,दीपक पाटील, उदय होगले,अमोल गावडे, संभाजी शिंदे, बिरू पुजारी,धनाजी माने, संभाजी निंबाळकर, अनिल हुपरीकर, शिवाजी काळे, बंटी माळी, महादेव गावडे, भारत ढाले, किरण सेवेकरी, मंगेश नलवडे, विजय मोरे, रमेश बेंद्रे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कारखाना प्रशासनाने मात्र या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या आंदोलनामुळे उस गाळप हंगामाच्या सुरुवातीसच संघर्षाची चाहूल लागली आहे.
तोपर्यंत गेटबंद आंदोलन सुरूच राहील अंकुश संघटना आक्रमक
चिपरी / प्रतिनिधी