शिरोळ / प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षांत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या पुढाकाराने शिरोळ शहरात विकासाच्या कामांचा मोठा वेग पाहायला मिळाला आहे.कोट्यवधी रुपयांचा निधी शहरासाठी मिळवून अनेक महत्त्वपूर्ण विकासकामांना गती देण्यात आली असून काही कामे पूर्णत्वास तर काही अंतिम टप्प्यात आली आहेत.गत निवडणुकीत नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यशस्वी ठरले आहेत.राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून गट-तट, पक्षभेद न बघता शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात आले.रस्ते काँक्रीटीकरण,नवीन पाणी पुरवठा योजना,दिवाबत्ती,भुयारी गटार,समाज मंदिर हॉल,व्यायाम शाळा,सुसज्ज गार्डन आणि सार्वजनिक सुविधांच्या उभारणीसह विविध पायाभूत सुविधांच्या कामांमुळे शिरोळ शहराचा चेहरामोहरा बदलताना दिसत आहे.नागरिकांच्या सहभागातून आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने अनेक विकास प्रकल्प मार्गी लागले.त्यामुळे राजर्षी शाहू विकास आघाडीचा जनाधार सर्व प्रभागांत वाढताना दिसत आहे.नागरिकांमध्ये आघाडीबद्दल सकारात्मक भावना असून,आगामी निवडणुकांसाठी या विकासाच्या कामांच्या बळावर आघाडीला चांगला पाठिंबा मिळणार आहे.तथापि, सध्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी आगामी आघाडीच्या रचनेबाबत कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.राजर्षी शाहू विकास आघाडीतील कार्यकर्ते आणि नागरिक यांचे लक्ष आता त्यांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या बळावर आगामी निवडणुकीतही राजर्षी शाहू विकास आघाडी शहरात आपला ठसा उमटवेल,अशी अपेक्षा आमदार यड्रावकर व अमरसिंह पाटील गटाच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त केली जात आहे. नागरिकांचा विकास हा केंद्रबिंदू ठेवून आघाडीची वाटचाल पुढेही सुरु राहील, तसेच आगामी काळातही शिरोळ शहराच्या विकासासाठी सातत्याने काम होईल,अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.