जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर शहरातील जयसिंगनगर परिसरात राहणाऱ्या लखन बागडी या तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना आज रविवार, दि.26 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.उदगाव टोल नाक्याजवळील नदीकाठी मित्रासोबत पार्टीसाठी गेलेल्या लखन बागडीचा वादातून मित्रानेच दगड घालून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जयसिंगपूर येथील लखन बागडी हा आपल्या काही मित्रासोबत दुपारच्या सुमारास उदगाव टोल नाक्याजवळील नदीकाठी पार्टी करत असताना त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला.वाद चिघळल्याने मित्राने लखनच्या डोक्यात मोठा दगड घातला.त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी लखनला उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या घटनेने जयसिंगपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.अलिकडच्या काळात शहरात ही दुसरी खुनाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.खुनानंतर संशयित मित्र फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी पोलिसांनी काही संशयितांवर लक्ष केंद्रित केले आहे. जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सत्यवान हाक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.