शिरोळ / प्रतिनिधी
शिवसेना (उबाठा गट) चे माजी आमदार उल्हास पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा केला जातो.मात्र,यावर्षी २७ ऑक्टोबर रोजीचा वाढदिवस कोणताही अनावश्यक खर्च न करता साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.वाढदिवसाचा खर्च टाळून कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन उल्हास पाटील यांनी आज शुक्रवार,दिनांक २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत केले.या पत्रकार परिषदेला माजी सभापती कमरुद्दिन पटेल,फत्तेसिंग पाटील,रमेश माने, रावसाहेब माने,संजय माने यांसह उल्हास दादा प्रेमी आणि गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.उल्हास पाटील म्हणाले की,“शिरोळ तालुक्यात गत काही वर्षांत मोठे महापूर आले होते.त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ येथे आला होता.त्या मदतीची उतराई करण्याची वेळ आता आली आहे.सध्या सोलापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत.त्यांना सर्वतोपरी मदतीची गरज आहे.ते पुढे म्हणाले की, “माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी हार, गुच्छ, तुरे न आणता त्याऐवजी शैक्षणिक साहित्य,आवश्यक वस्तू देऊन वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले.त्यांच्या या निर्णयाचे कार्यकर्त्यांनी स्वागत करत पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी उल्हास दादा पाटील गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.