शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यात सामाजिक,धार्मिक आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात नेहमीच सक्रिय राहिलेल्या जय भवानी महिला मंडळ व बाल शिवाजी दुर्गामाता मंडळ या महिला मंडळांकडून प्रभाग क्रमांक ७ मधून नगरपरिषद निवडणुकीत सौ.शुभांगी निलकंठ फल्ले यांना उमेदवारी द्यावी,अशी मागणी जोर धरत आहे.सौ.शुभांगी फल्ले या शिरोळ तालुका महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा तसेच शिरोळ ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या असून २०१३ ते २०१८ या कार्यकाळात यादव पॅनेलच्या वॉर्ड क्रमांक ५ मधून त्यांची बिनविरोध निवड झाली होती.त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामे राबवून नागरिकांचा विश्वास संपादन केला होता.त्यांचे पती निलकंठ बंडोबा फल्ले हे सुद्धा २००८ ते २०१३ दरम्यान ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात सक्रिय सहभाग घेतला होता.तसेच ज्या भागात स्ट्रीट लाईट नव्हत्या,त्या ठिकाणी प्रकाशयोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले.सौ.शुभांगी फल्ले या माजी ग्रामपंचायत सदस्या पार्वती बंडोबा फल्ले यांच्या सून असून त्यांना प्रशासकीय कामकाजाचा समृद्ध अनुभव आहे. सध्या त्या जीवन कल्याण अर्बन निधी बँकेच्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत.त्या पदावरून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवून त्यांनी समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.जय भवानी महिला मंडळ व बाल शिवाजी दुर्गामाता मंडळ या संस्थांच्या माध्यमातून त्या महिलांसाठी नेहमी सामाजिक,धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात.महिलांमध्ये एकता, आत्मविश्वास आणि नेतृत्व विकसित व्हावे, यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.गत निवडणुकीत पक्षाने दिलेली उमेदवारी ऐनवेळी मागे घेतली असतानाही सौ. फल्ले यांनी पक्षनिष्ठा जपत उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता.त्यामुळे त्यांच्या निष्ठा,कार्यक्षमता आणि सामाजिक योगदानाचा विचार करून यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत त्यांना उमेदवारी देणे आवश्यक असल्याचे मत स्थानिक महिला मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे.सौ.शुभांगी फल्ले या समाजकारण,महिला सक्षमीकरण आणि विकासकामांत अनुभवी,समर्पित व जनसंपर्क असलेल्या कार्यकर्त्या आहेत.त्यामुळे प्रभाग क्रमांक ७ मधून त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्या एक सक्षम आणि प्रभावी लोकप्रतिनिधी ठरतील,असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.