शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील अब्दुल लाट व हेरवाड या दोन गावांना जोडणाऱ्या मार्गाची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे.चैतन्य पब्लिक व गुरुकुल स्कूल जवळील मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून खड्डे,सांडपाणी आणि दुर्गंधी यांचे साम्राज्य पसरले असून,यामुळे प्रवासी व स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.या भागातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.सदर मार्गावर दोन निवासी शाळा असून,त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होण्याची भीती नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. सततच्या दुर्गंधीने आणि सांडपाण्यामुळे या ठिकाणी डासांचा उपद्रव वाढला असून,त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नागरिकांनी अनेक वेळा या मार्गाची दुरुस्ती करून द्या,अशी मागणी केली असतानाही अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.अब्दुल लाट गावात प्रवेश करताना पडलेल्या खड्यांमुळे आणि दुर्गंधीने प्रवासी आणि नागरिक हैराण झाले आहेत.तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रतिनिधित्वाखाली अनेक मोठमोठे विकासकामांचे दावे करण्यात येत आहेत.मात्र प्रत्यक्षात गावात प्रवेश करतानाच रस्त्यावरील खड्डे व दुर्गंधीने स्वागत होत असल्याने,हा विकास फक्त गुळगुळीत पुस्तकापुरता मर्यादित राहिला का?’ अशी संतप्त प्रतिक्रिया सध्या सर्वदूर ऐकू येत आहे.या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याच्या संतप्त भावना नागरिकातून व्यक्त केल्या जात आहेत.या मार्गाचा वापर दररोज शेकडो विद्यार्थी, शिक्षक,शेतकरी व सर्वसामान्य नागरिक करतात.येत्या आठ दिवसात अब्दुललाट गावची ग्रामदैवत देवाची यात्रा होत असून या यात्रेला अनेक पै- पाहुणे येणार आहेत. त्यामुळं आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी स्व- निधी लाऊन यात्रा सुरू होण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी व स्थानिक नागरिकातून होत आहे.