शिरोळ / प्रतिनिधी
कलेश्वर तलाव ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने संघाचे ज्येष्ठ सदस्य शिवाजीराव पाटील गुरुजी यांचा ७७ वा वाढदिवस अत्यंत उत्साही आणि स्नेहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन आणि मनःपूर्वक शुभेच्छा देत गुरुजींचा सन्मान केला.गुरुजींच्या सामाजिक कार्याचा, शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाचा आणि संघातील त्यांचा सक्रीय सहभागाचा उपस्थितांनी गौरव केला.गुरुजी हे संघातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असून,त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांना सकारात्मक ऊर्जा लाभली आहे. त्यांच्या सुसंस्कृत कार्यपद्धतीतून आजची नवी पिढीही प्रेरणा घेत आहे.या प्रसंगी एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात अनेक सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करत, गुरुजींबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली.अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत गुरुजींच्या सौम्य स्वभावाची, मार्गदर्शक भूमिकेची आणि सेवाभावाची प्रशंसा केली.कार्यक्रमाच्या शेवटी शिवाजीराव पाटील गुरुजींनी भावनिक भाषण करत सर्व सदस्यांचे आभार मानले. ते म्हणाले, “संघाच्या माध्यमातून मिळणारे आपलेपण, प्रेम आणि सन्मान हेच खरे जीवनाचे संपत्ती आहे. हे प्रेम आयुष्यभर जपण्यासारखे आहे.या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन संघाचे अध्यक्ष दत्ता पुजारी,उपाध्यक्ष खंडेराव हेरवाडे,तसेच कार्यकारिणी सदस्य पी.जी.पाटील, बाळासाहेब गावडे,अनिल आवळे,सुभाष आवळे,चावरे गुरुजी,चंद्रकांत भोरे आणि बाजीराव माळी यांनी नेटकेपणाने केले.