शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपालिकेचे कामकाज ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीत सुरू असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती.या अडचणीचा गांभीर्याने विचार करून महसूल मंत्री यांच्याकडे शिरोळ येथील जुने तहसील कार्यालयाच्या इमारतीसह ६२ गुंठे जागा नगरपालिकेला हस्तांतरित करण्याची मागणी केली होती.त्या मागणीला आज मूर्त स्वरूप मिळाले असून या प्रशस्त जागेमुळे कामकाज सुलभ आणि नागरिकांचा वेळ सुद्धा वाचणार असून शहराचे विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी व्यक्त केले.शिरोळ येथील जुन्या तहसील कार्यालयाची इमारतीसह ६२ गुंठे जागा नगरपालिकेतले हस्तांतरणाचा समारंभ संपन्न झाला, यावेळी आ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.शिरोळ शहरासाठी नवीन निर्माण झालेल्या नगरपालिकेच्या कामकाजाला गेल्या काही महिन्यांपासून जागेच्या अभावामुळे मोठी अडचण येत होती. नगरपालिकेचे कामकाज ग्रामपंचायतीच्या इमारतीत सुरू असल्याने जागेची कमतरता आणि सोयीसुविधांचा अभाव यामुळे प्रशासनाचे कामकाज विस्कळीत होत होते.नागरिकांनाही त्यांच्या दैनंदिन कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.या परिस्थितीची दखल घेत राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला.त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळत महसूल विभागाने जुने तहसील कार्यालयासह ६२ गुंठे जागा शिरोळ नगरपालिकेला वापरासाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला.महसूल विभागाने त्याबाबतचे आदेश जारी केले असून,या जागेचा हस्तांतरण सोहळा आज पार पडला.या निर्णयामुळे शिरोळ नगरपालिकेला स्वतंत्र इमारत व प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे.त्यामुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, नियोजनबद्ध आणि पारदर्शक होईल. नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व शासकीय सेवा मिळू शकतील,ज्यामुळे त्यांच्या वेळेची आणि श्रमांची बचत होणार असून भविष्यात सदरची जागा नगरपालिकेकडे वर्ग करून नगरपालिकेची सुसज्ज इमारत बांधण्यात येणार असल्याचे सांगितले.याप्रसंगी प्रशासक तथा मुख्याधिकारी अजित नरळे, अमरसिंह पाटील, बाबा पाटील, विजय देशमुख, बजरंग काळे, संभाजी भोसले, अमर शिंदे, शिवाजीराव देशमुख, दादासो कोळी,अविनाश टारे, श्रीवर्धन देशमुख, राजेंद्र माने, सुरज कांबळे, भूषण काळे, चंद्रशेखर चुडमुंगे, आशुतोष पाटील, रावसाहेब पाटील, एन.वाय. जाधव, लक्ष्मण भोसले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.