शिरोळ / प्रतिनिधी
ऐतिहासिक शिरोळ नगरीत गावगाड्याच्या परंपरेला उजाळा देणाऱ्या एक आगळ्यावेगळ्या उपक्रमाला आज सुरुवात झाली. शिरोळच्या इतिहासात प्रथमच एका सहनिवास संकुलात – श्री विजेंद्र निकेतन अपार्टमेंट – सार्वजनिक विश्वकर्मा पूजन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाला.ही संकल्पना होती पारंपरिक बलुतेदार समाजातील विविध व्यवसायांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व आजच्या युगातही आपल्या कार्यातून समाजाचे योगदान टिकवून ठेवणाऱ्या कुशल कारागिरांची. बलुतेदारी आणि अलुतेदारी ही पारंपरिक सेवा देणारी व्यवस्था महाराष्ट्राच्या गावगाड्यात एक महत्त्वाची रचना होती. १२ बलुतेदारांमध्ये सुतार, लोहार, कुंभार, चांभार, सोनार, तेली, न्हावी, परीट, माळी, कोळी, महार व मातंग या समाजांचा समावेश होता. तर अलुतेदारांमध्ये शिंपी, गोंधळी, खाटीक, घडशी, डावऱ्या, तांबोळी, कळवंत यांसारख्या सेवा देणाऱ्या समाजांचे स्थान होते.आजच्या पूजन कार्यक्रमात परंपरागत सुवर्णकार श्री. प्रतीक प्रसाद धर्माधिकारी, उत्कृष्ट सुतारकाम करणारे श्री. नंदकुमार माळी, बांधकाम क्षेत्रातील कॉन्ट्रॅक्टर श्री. शंकर शिंदे, श्री. राजू बोगार (सांगली), श्री. राजेश राय (बिहार), चर्मकार समाजाचे प्रतिनिधी श्री. किरण भंडारे आदी मान्यवरांचा सहभाग होता.कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शक आणि धार्मिक पूजन विधीचे प्रमुख गुरुवर्य वेदमूर्ती श्री. अनिकेत जोशी महाराज यांच्या पावन हस्ते श्री विश्वकर्मा पूजन पार पडले. उपस्थितांनी पूजनानंतर समाज एकत्रित राहावा, परंपरा जपाव्यात आणि गावगाड्याची मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवावीत, असा संदेश दिला.हा उपक्रम म्हणजे आधुनिक अपार्टमेंट संस्कृतीत पारंपरिक सामाजिक रचनेचा संगम होता. शिरोळकरांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण ठरला असून, भविष्यात असे उपक्रम वारंवार घडावेत, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली.”