कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड शहर व परिसरात पारंपरिक भक्तिभाव आणि धार्मिक सलोख्याच्या वातावरणात पीर-पंजाचे विसर्जन मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडले.बाराईमाम, तक्का, कुडेखान नालसाहेब, नालसाब यांच्यासह शहरातील एकूण २२ पीरांच्या भेटी सोमवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाविकांच्या अबीर उधळणीमध्ये संपन्न झाल्या.
या भेटी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून भक्तगर्जनेत वाजतगाजत मिरवण्यात आल्या. दर्शनानंतर पीर-पंजांना भाविकांच्या घरी नेण्यात आले आणि गुळाचा प्रसाद वाटून पूजन करण्यात आले. रात्री उशिरा मरगुबाई मंदिर, हलसिद्धनाथ मंदिर, पंत मंदिर आणि गोदड मशिदीत पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. दिवसभर पावसाने उघडीप दिल्यामुळे ढोल-ताशांच्या गजरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, कुडेखान बडेनालसाहेब व नालसाब यांनी हजरत दौलतशाह वली दर्गा तसेच राजवाड्यातील गणपतीचे दर्शन घेऊन भेटींचा प्रारंभ केला. शनीवारी रात्री ‘नववी खत्तल’ ही नवस फेडण्याची मानाची रात्र असल्याने हिंदू-मुस्लिम बांधवांनी चोगे, मलिदा, रोठ व मोदकाचा नैवेद्य अर्पण करून नवस फेडले. काही मशिदींमध्ये उशिरापर्यंत ‘खाई’ उधळण्याचा विधीही पार पडला.
शहरातील माळभाग, सन्मित्र चौक, शिकलगार वाडा, भबिरे मळा, दलित वस्ती, फकीरवाडा, शेळके गल्ली, मोमीन गल्ली, ढेपनपूर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात भाविकांनी घरोघरी पाणी घालून, गुळाचा प्रसाद देत, पूजन करून दर्शन घेतले. सोमवारी पहाटेपर्यंत विसर्जनाची शिस्तबद्ध प्रक्रिया सुरू होती.
पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी सांगितले की मोहरम सण लोकसहभागातून शांततेत साजरा झाला. प्रतिष्ठापना झालेल्या पीर-पंजाची समस्त बहुजन समाजबांधवांनी मनोभावे सेवा केली. कमिट्यांच्या सातव्या-आठव्या दिवशी पीर लवकर बाहेर काढल्यामुळे अधिक भाविकांना भेटीचा लाभ घेता आला. या यशस्वी आयोजनासाठी पालिका प्रशासन, पत्रकार संघ, विविध संघटना व नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले.पोलीस व गृहरक्षक दलाच्या सहकार्याने पीर-पंजाच्या प्रत्येक मिरवणुकीत सुरक्षा व्यवस्था सुस्थितीत होती.