कुंभोज / प्रतिनिधी
कुंभोज येथील रयत शिक्षण संस्था परिसरातील रस्त्याच्या दुरावस्थेकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक रहिवाशांनी दोन दिवसांपूर्वी रस्त्यातील खड्ड्यात झाडं लावून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला होता.या आंदोलनाची दखल घेत आज रविवार दिनांक २२ जून रोजी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.या कामाचा प्रारंभ वारणा दूध संघाचे संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील,तसेच जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.रयत संस्था परिसर,माळी मळा,सपकाळ मळा या भागांतील नागरिक गेल्या पंधरा वर्षांपासून रस्ता दुरुस्तीची मागणी करत होते.नागरिकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अरुण पाटील यांच्या पुढाकाराने दहा लाखांचा निधी उपलब्ध करून रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून,उर्वरित भागाचे कामही लवकरच अन्य निधीमधून पूर्ण केले जाईल,असे आश्वासन अरुण पाटील यांनी दिले.यावेळी शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले, राजाराम कारखाना संचालक अॅड.अमित साजनकर, माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी, गटनेते किरण माळी,सरपंच जयश्री महापुरे, उपसरपंच आप्पासाहेब पाटील ग्रामपंचायत सदस्य,तसेच ठेकेदार सागर पुजारी, ग्रामस्थ उपस्थित होते.