इचलकरंजी / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीतील यशाने गाफिल राहु नका. न्याय-अन्यायाची भावना न ठेवता कार्यकर्त्यांनी एकदिलाने आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे यश सर्वदुर पोहचवावे असे आवाहन उच्चतंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.इचलकरंजी महापालिकेत भाजपचा महापौर व्हावा यासाठीही सज्ज राहावे
,असे आवाहनही त्यांनी केले.दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिलेला शब्द पाळतात.त्यामुळे सत्कारासाठी मोठे मैदान शोधून ठेवा असे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना संधी देण्याबाबत सुतोवाच केले.
भारतीय जनता पार्टीच्यावतीने नवनिर्वाचित आमदार राहुल आवाडे,आमदार अशोकराव माने तसेच बुथ प्रमुखांचा सत्कार सोहळा आज इचलकरंजीत पार पडला.यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले,लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेल्या अपप्रचारामुळे महायुतीला सेटबॅक बसला. यामुळे कार्यकर्तेही साशंक होते.मात्र सर्वांच्या ताकदीने महायुतीला विशेषत:भाजपाला विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याग आणि शिस्तीचा कार्यकर्त्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्याचबरोबर माजी आमदार प्रकाश आवाडे यांनीही यंदा संधी असताना मुलगा राहुल आवाडे यांना पुढे आणणे आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याही त्यागाची शिकवणुक कार्यकर्त्यांनी जोपासावी. इचलकरंजी शहराने लोकसभेबरोबर विधानसभेलाही महायुतीला भक्कम ताकद दिली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही यश मिळेल. कार्यकर्त्यांनीही एकदिलाने महायुतीतील सर्वांना सोबत घेऊन निवडणुकांना सामोरे जावे व भाजपला यश मिळवून द्यावे. इचलकरंजीत पहिला महापौर भाजपचा व्हावा आणि हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपसह महायुतीला यश मिळावे यासाठी एकदिलाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
देशाची परिपूर्ण विकासाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2047 ला देश महासत्ता बनवण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अथक वाटचाल सुरु ठेवावी, असेही प्रतिपादन मंत्री पाटील यांनी केले. माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्ह्यातील विधानपरिषदेचा पुढचा आमदार भाजपचाच असेल असा विश्वास व्यक्त केला. तर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी 5 जानेवारी रोजी इचलकरंजीत भाजप सदस्य नोंदणी होणार आहे. 50 हजार सदस्य नोंदणी व्हावी यासाठीची मोहिम यशस्वी करावी. पक्षाचे निष्ठेने काम करणार्या कार्यकर्त्यांना स्थानिक निवडणुकीत संधी मिळेल. भाजपची शिस्त पाळून कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी कार्यरत रहावे, असे आवाहन केले. आमदार राहुल आवाडे म्हणाले, लाडकी बहिण योजनेसह शासनाने दिलेला शब्द पाळत यंत्रमाग उद्योगला वीज बिल सवलत दिल्याने संजीवनी मिळाली आहे. आमदार म्हणून नाही तर कामगार म्हणून मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत राहणार आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला अधिक यश मिळावे, यासाठी कार्यकर्त्यांनी ताकद द्यावी. मतदारसंघातील प्रश्न सोडवणुकीसाठी मंत्री चंद्रकांतदादांनी विशेष लक्ष द्यावे, आवाहनही केले. अशोक स्वामी यांनी चंद्रकांतदादा पाटील यांना कोल्हापूरचे पालकमंत्री तर सुरेश हाळवणकर यांना आमदार करण्याची मागणी केली. स्वागत शहराध्यक्ष अमृत भोसले तर प्रास्ताविक शहाजी भोसले यांनी केले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार राहुल आवाडे यांच्यासह 13 सदस्यांची कोअर कमिटी जाहीर केली. व्यासपीठावर आमदार अशोकराव माने, अरुण इंगवले, मिश्रीलाल जाजु, राजवर्धन नाईक-निंबाळकर, प्रकाश दत्तवाडे, प्रसाद खोबरे, जयेश बुगड, अनिल डाळ्या, अश्विनी कुबडगे, उर्मिला गायकवाड आदी उपस्थित होते.