कोथळी / प्रतिनिधी
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले : ग्रामपंचायतीने भोंगा सुरू करण्याची मागणी
कोथळी येथे गुरुवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दोन बंद घरे फोडण्याबरोबरच पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला.मात्र जागरूक नागरिकांमुळे चोरीचा प्रयत्न फसला असला तरी गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी भेट देऊन ग्रामस्थांना दक्ष राहण्याचे आवाहन केले.गावातील दोन ठिकाणी चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. जयसिंगपूर पोलिसांनी आज शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी दिवसभर परिसरातील भागाची पाहणी करून माहिती घेतली.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी कोथळी येथील बोरगावे गल्लीत गुरूवार रात्री २ वाजण्याच्या सुमारास संजय बोरगावे यांच्या खिडकीच्या स्लाइडिंग दरवाज्याचे लॉक तोडून दरवाज्याच्या कडी काढण्याचा प्रयत्न करीत असताना खिडकी लगत झोपलेल्या त्यांच्या मुलग्याने आरडा-ओरडा केला असता चोरटे पळून गेले.चोर गावात आल्याचे बोरगावे यांनी फोन करून गल्लीतील ग्रामस्थांना सावध करत बाहेर येऊन चोरट्यांचा शोध घेतला असता चोरटे पसार झाले होते.जयसिंगपूर पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन सावध राहण्याचे आवाहन केले.दरम्यान अशोक बोरगावे व अमित बोरगाव यांच्या राहत नसलेल्या बंद घराचा कुलूप तोडून चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला.दोन्ही ठिकाणी मौल्यवान वस्तू नसल्याने आर्थिक नुकसान झाले नाही. चोरीचा प्रयत्न झालेल्या घरांच्या शेजारील घरांना बाहेर कडी लावण्यात आली होती. चोरट्यानी अमित बोरगावे यांच्या घरातील फ्रिज मधील दूध घेऊन ते गरम करून पिल्याचे निदर्शनास आले.भिमगोंडा बोरगावे,रावसाहेब बोरगावे, पोपट विभुते,संतोष पाटील -घुमाण्णा, कुमार पाटील – समगे आदींच्या घरातील स्लाइडिंग खिडकीचे दरवाज्याचे लॉक तोडून मुख्य दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याचे निर्देशनास आले आहे.तर सीसीटीव्हीत दिसणारी निळ्या रंगाची अंगावरील शाल व कुऱ्हाड चोरीच्या प्रयत्न केलेल्या ठिकाणी टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले.या चोरीच्या प्रकारामुळे गावात धोक्याचा इशारा देणारा ग्रामपंचायतीचा भोंगा गेल्या सात वर्षापासून बंद आहे तो ग्रामपंचायतीने पुन्हा सुरू करावा अशी मागणी पुन्हा एकदा या चोरीच्या घटनेनंतर ग्रामस्थातून होऊ लागली आहे.कालच्या झालेल्या चोरीच्या घटनेत मौल्यवान वस्तू किंवा रक्कम चोरीस गेली नसली तरी या घटनेने ग्रामस्थात घबराट पसरली आहे.जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप पोलीस पाटील किरण खंडागळे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे.