कुरुंदवाड / प्रतिनिधी
हेरवाड ता.शिरोळ येथे गावातून गेलेल्या सलगर-सदलगा राज्य मार्गावर सात ठिकाणी बांधकाम विभागाने गतीरोधक पट्टे तयार केले आहेत.रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या वाढत्या वेगाला आळा घालण्यासाठी हे पट्टे तयार करण्यात आले असले तरी,त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांनी ग्रामस्थांना त्रस्त केले आहे.या गतीरोधक पट्ट्यांमुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांची ध्वनी प्रदूषण करणारी आदळआपट होत असून याचा ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
दरम्यान गतीरोधक पट्ट्यांमुळे वाहनांचा आवाज मोठ्या प्रमाणात वाढत आहे.विशेषतः रात्रीच्या वेळी हा आवाज त्रासदायक ठरत असून, ग्रामस्थांना झोपेत व्यत्यय येत आहे.यामुळे शाळकरी मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत साऱ्यांनाच समस्यांना सामोरे जावे लागत आहे.हेरवाड गावातुन सलगर-सदलगा राज्यमार्ग झाल्यापासून अपघाताची मालिका सुरू आहे.हे बहुतांश अपघात गावाबाहेरच झाले आहेत.मात्र बांधकाम विभागाने गावातच सात ठिकाणी पट्टे मारले आहेत.वेगावर मर्यादा येण्यासाठी हे पट्टे मारले असले तरी वाहनांचा वेग काय कमी झालेला नाही.वाहने भरधाव जात असल्याने या पट्ट्यावर होत असलेल्या आदळ-आपटीचा होणारा आवाज सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. याऐवजी रुंद आणि प्रभावी गतीरोधक तयार केले तर अपघातांवरही नियंत्रण येईल आणि आवाजाचे प्रदूषणही थांबेल.
अपघात टाळण्यासाठी गतीरोधक पट्ट्यांचा पर्याय अवलंबण्यात आला आहे, असे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. “गतीरोधक पट्टे तयार करताना नियमांचे पालन केले गेले आहे. मात्र, ग्रामस्थांच्या मागणीनुसार रुंद गतीरोधक तयार करण्याचा विचार करावा अशी मागणी मेहबूब गलगले या नागरिकाने केली आहे.
चौकट
ध्वनी प्रदूषणाचा त्रास आणि उपाययोजना
गतीरोधक पट्ट्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. यावर उपाय म्हणून रुंद व प्रभावी गतीरोधक बसवावेत, जे आवाज कमी करतील. गतीरोधकांचे डिझाइन सुधारून भारतीय रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करावे. तसेच, रात्रीच्या वेळी वाहतूक वेगावर कडक नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.