इचलकरंजी / प्रतिनिधी
पंचगंगा नदीकाठावरील काही गावांसह इचलकरंजी शहर परिसरात उद्भवलेल्या काविळ सदृश्य साथीच्या संदर्भात आमदार डॉ.राहुल आवाडे यांनी केलेला पाठपुरावा व सूचना संदर्भात संबंधित गावात व शहरात शनिवारपासून तातडीने सर्व्हे करुन आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.नागरिकांनी घाबरुन न जाता आवश्यक ते औषधोपचार घेण्यासह प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आमदार डॉ.राहुल आवाडे यांनी केले आहे.मागील काही दिवसांपासून पंचगंगा नदीकाठावरील काही गावात काविळी सदृश्य आजाराची साथ मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.अनेकांना त्याची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.त्याचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊन कोणाचाही बळी जावू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करुन खबरदारी घेण्यात यावी अशी सूचना आमदार आवाडे यांनी जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी यांना केली होती.त्याची दखल घेत आरोग्याधिकारी यांनी तातडीने ज्या ज्या गावात काविळ सदृश्य आजाराचे रुग्ण आहेत.त्याठिकाणचा सर्व्हे करुन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्याचबरोबर इचलकरंजी शहरातही आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जाणार आहेत.