क्षारपडमुक्तीचा आधुनिक ‘भगीरथ’ उद्यानपंडित गणपतराव पाटील
संजय सुतार / विशेष
अवघे बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन, शेती क्षेत्रामध्ये पाऊल ठेवून एक प्रयोगशील, सजग आणि सृजनशील शेतकरी,सहकार चळवळ वाढीसाठी ग्राउंड लेव्हलवर काम करणारा कार्यकर्ता,राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारा,सर्वसामान्यांच्या सर्वांगीण हितासाठी झटणारा नेता,एका साखर कारखान्याचा चेअरमन आणि दत्त उद्योग समूहातील सर्व संस्थांना प्रगती पथावर नेणारा मार्गदर्शक, सेंद्रिय शेती आणि क्षारपड मुक्ती साठी प्रयत्न करणारा भगीरथ अशी अनेकविध कार्याची वाटचाल ही उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाला नवी उंची देणारी ठरली आहे.दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना १९६९ साली झाली.सुरवातीस १२५० मे. टन प्रतीदिन गाळप क्षमता असणारा कारखाना आज रोजी १२००० मे. टन प्रतीदिन गाळप करीत आहे. तसेच इथेनॉल व ३६ मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प कारखान्याने उभा केला आहे. कारखान्याचे कार्यक्षेत्र मल्टीस्टेट असून महाराष्ट्र राज्यातील चार तालुके व कर्नाटक राज्यातील २ तालुके असून त्यातील एकूण ११५ गावे समाविष्ठ आहेत.संस्थेचे माजी चेअरमन, सहकार महर्षि डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील साहेबांच्या दुरदृष्टीतून जास्तीत जास्त जमिनी बागायती असाव्यात, याकरिता २४ गावामध्ये सहकारी तत्वावर पाणीपुरवठा स्किम कार्यरत केल्या. जमिनी बागायती झाल्यानंतर प्रती एकरी ऊस उत्पादन वाढविण्याकरिता व जमिनीची सुपीकता टिकवणेसाठी १९८६ साली माती परीक्षण विभागाची स्थापना केली. त्यानंतर ऊस विकास योजना राबविण्याचे ठरवून काखान्यामध्ये स्वतंत्र ऊस विकास विभाग स्थापन करून त्यामध्ये १२ ऍग्री (agree) ओव्हरसिअर व ६५ शेती मदतनिस यांची नेमणूक केली. यामुळे गावनिहाय शेतकऱ्यांच्या बांधावर जावून जमिनीच्या पुर्वमशागतीपासून ते ऊस पिक काढणीपर्यंतचे संपूर्ण मार्गदर्शन त्याचबरोबर माती, पाणी व पाने पृथःकरण अहवाल सभासदांना मोफत देवून मार्गदर्शन केले जावू लागले. ते आजही सुरु आहे.सा.रे. पाटील साहेब यांच्यानंतर २०१५ साली कारखान्याचा चेअरमन म्हणून गणपतराव पाटील (दादा) यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे सरासरी एकरी ऊस उत्पादन ३७ मे. टन असल्याचे निदर्शनास आले. हे उत्पादन फारच कमी होते म्हणून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील संशोधन केंद्रामधील शास्त्रज्ञांची बैठक घेतली. त्यामध्ये कारखान्याच्या माती परीक्षण केंद्रामधील पाच वर्षांची एकूण २२,२३० माती नमुने अहवाल अभ्यास केला गेला. यामध्ये जमिनीतील सेंद्रिय कर्ब ०.२३ टक्के पर्यंत होता आणि कार्यक्षेत्रातील जमिनी पाणस्थळ व क्षारपड ग्रस्त असलेचे निदर्शनास आले. शास्त्रज्ञांच्या सल्यानुसार जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्याकरिता गावनिहाय शेतकरी मेळावे घेवून हिरवळीची खते, सेंद्रिय खते,कंपोष्ट खत,पाचट व्यवस्थापन व जिवामृत स्लरी यांचा भरपूर वापर करण्याबाबत सातत्याने प्रयत्न केले. तसेच जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढीसाठी गाईचे शेण व गोमुत्र यांचा वापर वाढावा म्हणून कारखाना कार्यक्षेत्रामध्ये गाववार प. पू. काडसिध्देश्वर महास्वामीजी कणेरी मठ यांच्या मार्गदर्शनाखाली गोपरिक्रमा अभियान राबविले. याचेच फलित म्हणून कारखाना कार्यक्षेत्रातील जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण सरासरी ०.८५ टक्के ते १.३५ पर्यंत पोहचले आहे. एकरी १०० मे. टन व झेप १५०-२०० टन अशा विविध योजना ऊस विकास योजनेअंतर्गत राबविल्यामुळे उच्च ऊस उत्पादन व साखर उतारा वाढून शेतकरी व कारखान्यास आर्थिक सुबत्ता येण्यास मदत झाली.कार्यक्षेत्रातील जमिनी जशा सेंद्रिय कर्बामध्ये कमी होत्या, तसेच जमिनी पाणथळ व क्षारपड समस्याग्रस्त होत्या. त्याची कारणे शोधत असताना प्रामुख्याने नैसर्गिक ओढे, नाले व बांध व्यवस्था लोप पावली होती. तसेच गावापासुन राज्यापर्यंत रस्त्यांची उंची वाढत गेल्यामुळे पाणी साचून त्याचा निचरा न झाल्याने, तसेच बागायती पिकासाठी पाण्याचा अतिवापर अशा अनेक कारणामुळे जमिनी नापीक झाल्या व उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. शिरोळ तालुक्यामध्ये अंदाजे १२००० हेक्टर क्षेत्र पाणथळ व क्षारपड बनले असून ३० ते ४० वर्षापासून पिकावाचून पडीक असल्यामुळे शेत मालक हा शेतमजूर बनला आहे. पाणथळ व क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी कारखान्यातील शेती विभाग, माती परीक्षण केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ व केंद्रीय क्षारपड संशोधन केंद्र कर्नाल, हरियाना येथील शास्त्रज्ञांना बोलावून कारखाना कार्यस्थळावर सखोल चर्चासत्र आयोजीत केले. चर्चासत्रामध्ये उघडी चर प्रणाली मधील दृश्यपरिणाम लक्षात आल्याने भूमिगत निचरा प्रणाली राबविण्याचे ठरले. काळ्या कसदार जमिनीतील उघड्या चरीचे आयुष्यमान फार कमी असते, तसेच जमिनीची विभागणी होत होती. त्याकरिता बंदिस्त मुख्य पाईपलाईनचा वापर करण्याचा निर्णय घेतला. याबाबत गावोगावी शोतकऱ्यांच्या मिटींग घेवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवून क्षारपड जमीन सुधारण्याबाबत जनजागृती केली. यामध्ये उघड़ी निचरा प्रणाली व बंदिस्त निचरा प्रणाली याचे फायदे तोटे पाहून कृत्रिम बंदिस्त निचरा प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय झाला. परंतु सदर प्रकल्पाकरिता कोणतीच वित्तीय संस्था अर्थपुरवठा करण्यास तयार नव्हती. गणपतराव पाटील यांनी त्यांच्या शेतीमधील प्रदिर्घ अनुभवाच्या आधारे व धाडसाने डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील जयसिंगपुर उदगाव सह. बँकेच्या माध्यमातून ७/१२ पत्रकी नापीक जमिनीवरती कर्जपुरवठा करून शेतकऱ्यांना एक नविन दिशा दिली. या बँकेच्या धाडसी निर्णयामुळे क्षारमुक्त प्रकल्पाने गती घेतली. सुरुवातीस बुबनाळ गावातील १५० एकर जमिनीवर यशस्वीरित्या पथदर्शी प्रकल्प पूर्ण केला. या प्रकल्पाची यशस्वी वाटचाल पाहून महाराष्ट्र राज्यातील १६ गावामध्ये ५८७५ एकर क्षेत्रावर व कर्नाटक राज्यातील ४ गावामधील ११२५ एकर क्षेत्रावर काम सुरू केले. सदर कामाचे आर्थिक व्यवहार पारदर्शी होण्याकरिता प्रत्येक गावामध्ये सहकारी तत्वावर क्षारपड जमीन सुधारणा संस्था स्थापन करून त्याद्वारे काम करण्यात आले. आज 24 गावात हे काम सुरू आहे.गेल्या ४० वर्षापासून जमिनी क्षारपड असल्यामुळे शेत मालकांना आपल्या जमिनीच्या चतु:सिमा माहित नव्हत्या, त्यासाठी तालुका भुमी अभिलेख व महसूल कार्यालय यांच्याकडून सहकार्य घेवून पुढील कामकाजास सुरुवात केली.आज अखेर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील एकूण २४ गावामध्ये, १०,००० एकरावर 200 कि.मी. लांबीची मुख्य पाईपलाईन व ४,००० एकर क्षेत्रावर अंतर्गत निचरा प्रणालीचे काम पूर्ण झाले असून विविध पिकापासून उत्पादन घेतले जात आहे. सदर प्रकल्पग्रस्त जमिनीमधील माती व पाण्याचे पृथ:करण करण्याचे काम वरचेवर सुरू असते. या प्रकल्पामुळे एका वर्षात जमिनीतील एकूण विद्राव्य क्षारांच्या प्रमाणात ८३ टक्के इतकी घट झाली आहे. तसेच ऊस उत्पादनात दुपटीने वाढ झाली आहे. क्षारपड सुधारणा प्रकल्पातील पिके पाहून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होत आहे व सांगली जिल्हा व इतर ठिकाणची नविन गावे यामध्ये समाविष्ठ होत आहेत.तसेच कारखान्याच्या पुढाकाराने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ( RKVY) ११ कोटी ४६ लाखाचे अनुदान मंजूर होवून एकरी २४,००० रू. प्रमाणे अनुदान सातत्याने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना मिळवून देण्यात दादांना यश आले आहे.दादांच्या माध्यमातून होत असलेल्या क्षारपड सुधारणा प्रकल्पास अर्थात क्षारपड जमीन मुक्तीच्या या कामाची दखल घेवून केंद्र सरकारने क्षारपड मुक्तीच्या पॅटर्नला ‘श्री दत्त पॅटर्न’ म्हणून पेंटेंट देऊन दादांच्या कार्यावर शिकामोर्तब केले आहे हे उल्लेखनीय आणि अभिमानास्पद आहे.श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पुढाकाराने गेल्या पाच वर्षांमध्ये अत्यंत शास्त्रशुध्द पध्दतीने पारदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पास शैक्षणिक, संशोधन संस्था, शासकिय, प्रशासकिय, राजकीय व विधायक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी भेटी देवून क्षारपड मुक्तीचे तंत्रज्ञान जाणून घेतले आहे. तसेच शिरोळ तालुक्यातील जमिनी क्षारमुक्त करण्याच्या कारखान्याने केलेल्या कार्याचे कौतुक केले आहे.