दानवाड / प्रतिनिधी
दुभत्या जनावरांपासून दूध मिळविण्यासाठी व त्यांच्या शरीराची समाधानकारक वाढ होण्यासाठी त्यांना समतोल आहार देणे आवश्यक असते.खरीप हंगाम वगळता जनावरांना हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही.अशावेळी वाळलेला भाताचा पेंडा,गव्हाचे काड, गवत जनावरांना दिले जाते.
यामध्ये कठीण व तंतुमय पदार्थ असतात तसेच प्रथिनांचे प्रमाण कमी असते.अशा वाळलेल्या चाऱ्यावर जर युरियाची प्रक्रिया केली तर चाऱ्याची पचनीयता वाढते शिवाय चाऱ्याची चव सुधारल्याने चारा जनावरे आवडीने खातात.महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी अंतर्गत असणाऱ्या शरद कृषि महाविद्यालय,जैनापुर येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनीनी ग्रामीण कृषि जागरूकता, कृषी कार्यानुभव आणि कृषि औद्योगिक कार्यक्रम अंतर्गत जुने दानवाडमध्ये चारा प्रक्रियेचे प्रात्यक्षिक पशुपालकांना दाखविण्यात आले.
त्यासाठी त्यांनी १० किलो वाळलेला चारा घेतला. २०० ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम मीठ, १०० ग्रॅम गूळ, १० लिटर पाण्यामध्ये मिसळून एकजीव करून यांचे मिश्रण केले व चाऱ्यावर शिंपडले. हा प्रकिया केलेला चारा २१ दिवसांनी जनावरांना खायला देण्याचा सल्ला कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना दिला.चारा प्रक्रियेसाठी घेतलेल्या युरियाचे प्रमाण २ टक्क्यांपेक्षा अधिक नसावे असे सांगत हा चारा सहा महिन्यांखालील तसेच गाभण जनावरांना देऊ नये असे मार्गदर्शनही करण्यात आले.
यावेळी कृषिकन्या तेजस्विनी खोले,रसिका पाटील, ऋतिका पाटील,योगिता पुजारी, तेजस्विनी रजपूत, सोनाली रोकडे उपस्थित होते.या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एस.जे पाटील,उपप्राचार्य आणि कार्यक्रमाचे प्रमुख प्रा.एस.एच.फलके कार्यक्रम समन्वयक डॉ.आर.टी कोळी व कार्यक्रम अधिकारी प्रा. पी.व्ही.आवळे व विशेषतज्ञ प्रा.व्ही.यु.तोडकर यांचे मार्गदर्शन लाभले.