जुने दानवाड / प्रतिनिधी
अन्नसुरक्षा साध्य करण्यासाठी, पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि पाणी टंचाई अशा समस्यांचे निवारण करण्यासाठी कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व वाढत आहे.ड्रोन हे असेच एक अत्यंत अचूक आणि प्रभावी तंत्रज्ञान आहे. यामध्ये पिक निविष्ठाच्या गरजेवर अचूक आणि योग्य ठिकाणी वापरून शेतीत क्रांती घडवून आणता येते.
पारंपारिक पद्धतीत विद्राव्य खतांची, कीटकनाशकाची फवारणी करताना कीटकनाशके,खते,पाणी अधिक प्रमाणात वापरले जाते शिवाय मनुष्यबळही अधिक लागते. मात्र ड्रोनद्वारे फवारणी घेतली असता पिकावर सर्वत्र समप्रमाणात,अचूक क्षेत्रावर आणि कमी वेळेत फवारणी घेता येते. हीच गरज ओळखून महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असणाऱ्या शरद कृषि महाविद्यालय, जैनापुर येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनीनी ग्रामीण कृषि जागरूकता, कृषी कार्यानुभव आणि कृषि औद्योगिक कार्यक्रमा अंतर्गत जुने दानवाडमध्ये शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे उस पिकावर फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी महिलांनी व पुरुषांनी विचारलेल्या प्रश्नांना कृषिकन्यांनी समर्पक उत्तरे दिली आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले. ग्रामस्थांचा प्रात्यक्षिकला चांगला प्रतिसाद होता.यावेळी कृषिकन्या तेजस्विनी खोले,रसिका पाटील, ऋतिका पाटील, योगिता पुजारी, तेजस्विनी रजपूत, सोनाली रोकडे उपस्थित होते.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एस.जे पाटील, उपप्राचार्य आणि कार्यक्रमाचे प्रमुख प्रा. एस. एच. फलके, कार्यक्रम समन्वयक डॉ.आर.टी कोळी व कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.व्ही.आवळे,व विशेषतज्ञ प्रा. आर. एम. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.