औरवाडच्या राजीव पत संस्थेच्या ठेवीदारांचा 29 रोजी शिरोळ तहसीलदार कार्यालयावर मोर्चा
औरवाड / प्रतिनिधी
औरवाड ता.शिरोळ येथील राजीव ग्रामीण बिगरशेती पत संस्था चेअरमन संचालक कॅशियर यांनी अफरातफर करून ठेवीदारांच्या पैशावर दरोडा टाकला आहे. ठेवीदारांच्या पैशासाठी लागेल ती मदत करण्यासाठी आंदोलन अंकुश तयार असून ठेवीदारांना त्यांच्या घामाचे पैसे मिळवून देण्यासाठी शिरोळ तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून पोलीस प्रशासनाला कायदेशीर कारवाईसाठी भाग पाडणार असल्याचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले.
औरवाड येथील मराठा समाज सभागृहात सोमवारी दुपारी राजीव पत संस्थेच्या ठेवीदारांची बैठक आयोजित केली होती.यावेळी ते बोलत होते.अन्यायग्रस्त सभासद, ठेवीदार प्रमुख उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना चुडमुंगे म्हणाले की संस्थेची चौकशी होऊन अफरातफर झाल्याचे सिद्ध होऊनही घोटाळा करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाली नाही की ठेवीदारांच्या पैशावर कोण बोलत नाही.
आंदोलन अंकुश ठेवीदारांचे पैसे मिळावेत यासाठी जे करणे आवश्यक आहे ते करेल पण त्यासाठी सर्व ठेवीदारांनीही आम्हाला साथ द्यावी लागेल.पोलीस फिर्याद घेत नसतील किंवा निबंधक पुढील कार्यवाही करत नसतील तर त्यांना ठेवीदारांचा मोर्चा नेऊन जाब विचारू असे सांगत येत्या 29 तारखेला शिरोळ तहसीलदार कार्यालयावर ठेवीदारांचा मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चाला ठेवीदारांनी मुला बाळासह उपस्थित रहावे असे आवाहन केले.
यावेळी अमोल गावडे,एकनाथ माने यांनी भाषणे केली महावीर कुंभोजे,भास्कर गावडे,महेश जाधव,महादेव काळे, कृष्णा देशमुख,प्रताप सूर्यवंशी, भास्कर गावडे, सुखदेव गावडे, इरफान बहादूर, अनिल दुग्गे, नारायण घोरपडे, प्रवीण अनुजे,मोईन अहमद पटेल, किरण जंगम आदी उपस्थित होते.