कीर्तन म्हणजे विचारांचे अनुष्ठान; प्रकाशबुवा मुळ्ये-गोंदीकर यांचे प्रतिपादन

Spread the love

नृसिंहवाडी / प्रतिनिधी

“समाजाला सत्याची शिकवण देणारा लोकशिक्षक म्हणजे कीर्तनकार असतो. मात्र आजकाल बाजारू कीर्तनकारांची संख्या वाढली आहे. कीर्तन हे एकप्रकारे विचारांचे अनुष्ठान आहे. कीर्तनातल्या मूल्यांप्रमाणे जर कीर्तनकारच वागत नसेल तर अभिनेता आणि कीर्तनकारात काही फरक उरत नाही. कीर्तनकारांनी आपल्या नावासमोरील उपाध्यांपेक्षा उपासना वाढवायला हवी, असे परखड मत प्रकाशबुवा मुळ्ये (गोंदीकर) यांनी व्यक्त केले. ते नृसिंहवाडीतील कृष्णावेणी उत्सवात कीर्तनसेवा करताना बोलत होते.

 

 

ते पुढे म्हणाले, “परमेश्वराच्या शोधार्थ आयुष्य जरी खर्ची घातले तरी कमीच आहे. कारण तो शोधाचा विषय नाही तर बोधाचा विषय आहे. बुद्धी आणि बोधाच्या एकत्र येण्यानेच परमेश्वराचे ज्ञान होऊ शकते. परंतु ज्ञान मिळाल्यावरही अहंकारमुक्तीसाठी गुरूकृपेची गरज आहे. आजकाल मनाची चंचलता वाढली आहे. मनाला एकाग्र करून मनुष्याने आपले ध्येय गाठले पाहिजे. समर्थ रामदास झाले नसते तर महाराष्ट्र असमर्थ राहिला असता. महापुरुषांचे पुतळे उभारले नसले तरी चालतील;

 

 

पण त्यांच्या नावावर होणारे वाद थांबवायला हवेत. पालकांनी आपल्या मुलांना खरा इतिहास सांगितला पाहिजे. जाती-वंशाचा वृथा अभिमान सोडून द्यायला हवा. खरोखरची सुधारणा आणि सुधारणेची नुसती सूज यात फरक आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी संतांच्या विविध अभंगांचे दाखले देत अनेक विषयांवर चिंतन केले.

 

 

संतपदांचे गायन आणि त्याचे सोदाहरण निरुपणामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. तबल्यासाठी शरदबुवा घाग यांनी साथसंगत केली. यावेळी संवादिनी वादक अवधूत पुजारी यांनी गायलेले ‘विघ्न हरण गौरीके नंदन’ व ‘मला तारी गंगे’ ही गीते श्रोत्यांच्या विशेष पसंतीस पडली. कीर्तनाचा उत्तररंग झाल्यानंतर कृष्णावेणी मातेची आरती व प्रार्थना करण्यात आली.

error: Content is protected !!