हातकणंगलेत तातडीने पीक पंचनाम्यांचे आदेश; दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीला गती!
आमदार डॉ.अशोकराव माने यांच्या पाठपुराव्याला यश; दहा तालुक्यांत प्रत्यक्ष पाहणीचे निर्देश, शासनाकडे अहवाल सादर होणार
हातकणंगले / प्रतिनिधी
खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीमुळे अडचणीत सापडलेल्या हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घडामोड घडली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील तांत्रिक निकषांमुळे दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून वगळलेल्या हातकणंगले तालुक्यात आता तातडीने पीक पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील निर्णयानुसार राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले आहेत. आमदार डॉ. अशोकराव माने यांनी हातकणंगले तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या मागणीला गती मिळाल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील ३०५ तालुक्यांचा दुष्काळी तालुके म्हणून ‘ट्रिगर-२’मध्ये समावेश केला आहे. मात्र, खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील तांत्रिक निकषांमुळे हातकणंगले तालुका या यादीतून वगळण्यात आला होता. दुसरीकडे, तालुक्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे आमदार डॉ. माने यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे केवळ तांत्रिक निकषांचा आधार न घेता प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून हातकणंगले तालुका विशेष बाब म्हणून संपूर्णतः दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.
यासंदर्भात आमदार डॉ. माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील तसेच मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव विनीता वैद-सिंगल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मंत्रालयाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून शासकीय पत्र प्राप्त झाल्याची माहिती आमदार डॉ. माने यांनी दिली.
दहा तालुक्यांत प्रत्यक्ष पाहणीचे निर्देश
शासनाच्या आदेशानुसार हातकणंगलेसह मावळ, दिंडोरी, चिपळूण, कर्जत, पेण, तळा, महाड, वाडा आणि विक्रमगड या दहा तालुक्यांमध्ये तातडीने पंचनामे करण्यात येणार आहेत. संबंधित तालुक्यांतील प्रमुख पिकांचे २० टक्के सर्वेक्षण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या निकषांनुसार प्रत्यक्ष पाहणी पूर्ण करून मंडळनिहाय अहवाल तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
या सर्वेक्षणातून हातकणंगले तालुक्यातील पीक नुकसानीची प्रत्यक्ष स्थिती स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पुढील निर्णय घेण्यासाठी हा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, पंचनाम्यांचे आदेश म्हणजे तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्याचा अंतिम निर्णय नसून, प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि शासनाच्या पुढील निर्णयाकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून पाठपुरावा
हातकणंगले तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश व्हावा, यासाठी आमदार डॉ. विनयराव कोरे (सावकर) यांचे मार्गदर्शन तसेच खासदार धैर्यशील माने आणि आमदार राहुल आवाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आमदार डॉ. अशोकराव माने यांनी स्पष्ट केले.
पीक पंचनाम्यांचे आदेश मिळाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आता पंचनामे पारदर्शकपणे आणि वेळेत पूर्ण करून प्रत्यक्ष नुकसानीची नोंद शासनापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यानंतर हातकणंगले तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत शासन कोणता निर्णय घेते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
चौकट
“हातकणंगले तालुक्याचा दुष्काळी तालुक्यामध्ये समावेश व्हावा म्हणून मी पहिल्यापासून प्रयत्नशील होतो.तांत्रिक कारणांमुळे अडचणी येत होत्या, मात्र सततच्या पाठपुराव्यामुळे आज सर्वेक्षणाचे आदेश प्राप्त झाले आहेत. हातकणंगले तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही.
आमदार डॉ.अशोकराव माने