शिरोळच्या बुवाफन महाराज उत्सव व नूरखान बादशाह उरूसाच्या तयारीला प्रारंभ! देणगी पावती पुस्तकाचे पूजन; लोकवर्गणी संकलनाचा उत्साहात शुभारंभ
सर्वधर्मीय ऐक्याची परंपरा जपण्यासाठी श्री गणेश चौक मित्र मंडळ सरसावले
शिरोळ / प्रतिनिधी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात सर्वधर्मीय ऐक्य, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळच्या ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूसाच्या तयारीला उत्साहात प्रारंभ झाला आहे. यंदाचा ऐतिहासिक धार्मिक सोहळा साजरा करण्याचा मान श्री गणेश चौक मित्र मंडळाला मिळाला असून, उत्सव आणि उरूस सर्वांच्या सहकार्याने भव्य, उत्साहपूर्ण व नेटकेपणाने साजरा करण्याचा निर्धार संयोजन समितीने केला आहे.
या पार्श्वभूमीवर उत्सव व उरूस संयोजन समितीच्या वतीने श्री बुवाफन महाराज मंदिरात देणगी पावती पुस्तकाचे पूजन करून लोकवर्गणी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पावती पुस्तकाचे पूजन आणि श्रीफळ वाढविण्याचा धार्मिक विधी पार पडला. यानंतर मान्यवरांनी उरूसासाठी आपली देणगी समितीकडे सुपूर्द करून या धार्मिक सोहळ्याच्या आयोजनासाठी सहकार्याचा हात पुढे केला.
शिरोळमधील श्री बुवाफन महाराज उत्सव आणि हजरत नूरखान बादशाह उरूस ही केवळ धार्मिक परंपरा नसून, विविध धर्मीय समाजघटकांना एकत्र आणणारी श्रद्धा आणि एकात्मतेची समृद्ध परंपरा आहे. या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, परस्पर आदर आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ होते. त्यामुळे उरूसाच्या आयोजनासाठी गावातील नागरिक, व्यापारी, विविध संस्था, मंडळे आणि सर्वधर्मीय भाविकांकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यंदा श्री गणेश चौक मित्र मंडळावर सोपविण्यात आलेली जबाबदारी सर्वांच्या सहभागातून यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संयोजन समितीने नियोजन सुरू केले आहे. लोकवर्गणीच्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीतून उत्सवाचे नियोजन करण्यात येणार असून, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी सी. जी. पाटील यांनी स्वागत केले. पंचगंगा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रताप ऊर्फ बाबा पाटील, नगरसेवक शरद ऊर्फ बापू मोरे, अमरसिंह शिंदे, माजी सरपंच अर्जुन काळे, बाजार समितीचे संचालक विजयसिंह माने-देशमुख, माजी उपनगराध्यक्ष पै. प्रकाश गावडे, निळकंठ ऊर्फ पिंटू फल्ले, उल्हास पाटील, पत्रकार बाळासाहेब माळी, डी. आर. पाटील, चंद्रकांत भाट, शक्तिजीत गुरव, दयानंद जाधव, लक्ष्मण भोसले, आबिद गवंडी, अविनाश टारे, पोपट गावडे, अमित ऊर्फ बंटी संकपाळ, बबन बन्ने, सूरज कांबळे, संजय मरळे, चंद्रकांत गावडे, विजय हेगाण्णा, बाळासो जाधव, भूषण गंगवणे, आशितोष पाटील, राहुल कोकणे, आप्पासो हेरवाडे, अमोल पाटील, अमोल हिरेमठ, सागर माळी, रमेश हेगाण्णा, विनायक खडके, नामा पाटील, सर्जेराव कांबळे, रमजान मुल्लाणी, भूषण काळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. किरण माने-गावडे यांनी आभार मानले.