शिरोळ तालुक्यात शेकडो जनावरे दगावल्याने दुग्ध व्यवसाय संकटात;
लंपीच्या संकटात दुध उत्पादक शेतकरी; गोकुळच्या इच्छुकांकडून मात्र पाठ फिरवल्याचा आरोप
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यात लंपी आजाराने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या पशुधनावर मोठे संकट ओढवले आहे.लंपीच्या प्रादुर्भावामुळे शेकडो जनावरे मृत्युमुखी पडल्याचा दावा दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून केला जात असून, दुग्ध व्यवसायाचा आर्थिक कणा हादरला आहे. एकीकडे पशुधन वाचविण्यासाठी शेतकरी धडपडत असताना दुसरीकडे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या हिताची भाषा करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी लंपीग्रस्त शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत जाऊन त्यांची साधी विचारपूसही केली नसल्याची संतप्त प्रतिक्रिया दूध उत्पादकांमधून उमटत आहे.
शिरोळ तालुक्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती आणि दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. गेल्या काही काळातील पावसातील खंडामुळे ऊसासह विविध पिके पाण्याअभावी अडचणीत आली आहेत. त्यामुळे शेतीला आधार म्हणून अनेक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देत जनावरे सांभाळली.मात्र आता याच पशुधनावर लंपीच्या संकटाने घाला घातल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी आर्थिक संकट उभे राहिले आहे.
लंपीमुळे जनावरांच्या उपचारांचा खर्च वाढला असून, दूध उत्पादनावरही परिणाम होत आहे. काही शेतकऱ्यांना पशुधन गमवावे लागल्याने त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा मोठा आधारच हिरावला गेला आहे. अशा परिस्थितीत शासन, दूध संघ आणि संबंधित यंत्रणेकडून ठोस मदतीची अपेक्षा असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, गोकुळ दूध संघाची निवडणूक जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांची लगबग वाढली आहे. उमेदवारीसाठी नेत्यांच्या घराच्या वाऱ्या सुरू असताना ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बळावर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू आहे, त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मात्र गोठ्यापर्यंत पोहोचण्याची तसदी घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
“निवडणुकीच्या वेळी शेतकरी आठवतात; मग संकटाच्या काळात गोठ्यात येऊन विचारपूस का होत नाही?” असा सवाल दूध उत्पादकांकडून उपस्थित केला जात आहे.
दूध संस्थांचे चेअरमन व सचिव यांनीही केवळ निवडणुकीपुरते आश्वासन देणाऱ्यांपेक्षा दूध उत्पादकांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष भूमिका घेणाऱ्या आणि संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या उमेदवारांकडून त्यांच्या भूमिका स्पष्ट करून घ्याव्यात, अशी मागणी शिरोळ तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे. लंपीच्या संकटामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता गोकुळच्या निवडणुकीत किती बुलंद होतो, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.