सत्ता, प्रतिष्ठा, पदापेक्षा आपुलकीच्या नात्यानेच बँकेची प्रगती – आमदार डॉ. अशोकराव माने, श्री भरत अर्बन को-ऑप. बँकेचा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

सत्ता, प्रतिष्ठा, पद आणि पैसा यापेक्षा माणसांमधील आपुलकीचे नाते सर्वांत श्रेष्ठ आहे. हे नाते पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांनी जपल्यामुळेच श्री भरत अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने विश्वासार्हतेची वाटचाल कायम ठेवत प्रगती साधली आहे. बँक ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून सर्वसामान्यांच्या स्वप्नांना बळ देणारे आणि त्यांच्या कर्तृत्वाला दिशा देणारे व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी केले.

शिरोळ येथील श्री भरत अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शिरोळ शाखेच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहक स्नेहमेळावा व सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार डॉ. अशोकराव माने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन डॉ. श्रीवर्धन पाटील होते.

आमदार डॉ. अशोकराव माने म्हणाले, कै. डॉ. एस. के. पाटील आणि कै. डॉ. जे. जे. मगदूम यांनी सर्व समाजातील गोरगरीब, होतकरू आणि कष्टाळू नागरिकांची आर्थिक पत निर्माण व्हावी, त्यांनी छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू करून स्वावलंबी व्हावे, या व्यापक उद्देशाने बँकेची स्थापना केली. या विचारातून सुरू झालेल्या संस्थेने अनेक वर्षे सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजांना आधार देण्याचे काम केले आहे. त्यामुळे बँकेचा इतिहास हा केवळ आर्थिक व्यवहारांचा नसून सामाजिक बांधिलकीचा इतिहास आहे.

शिरोळ परिसरातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उभारण्यात आलेल्या छत्रपती शाहू इंडस्ट्रियल इस्टेटच्या स्थापनेत श्री भरत बँकेचा सिंहाचा वाटा असल्याचेही आमदार माने यांनी नमूद केले. उद्योग, व्यापार आणि रोजगारनिर्मितीला आर्थिक पाठबळ मिळाले तर परिसराच्या विकासाला वेग येतो. सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस सक्षम करण्याची भूमिका बँकेने पुढेही कायम ठेवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रारंभी संचालक डॉ. किरण अणुजे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक पै. विठ्ठल मोरे यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या आजवरच्या वाटचालीचा आणि प्रगतीचा आढावा घेतला. बँकेने ग्राहक, सभासद आणि खातेदारांचा विश्वास संपादन करत आर्थिक क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले असल्याचे त्यांनी सांगितले.

विश्वासाच्या बळावर बँकेची घोडदौड

चेअरमन डॉ. श्रीवर्धन पाटील म्हणाले, सभासद, खातेदार, कर्जदार आणि ठेवीदार यांनी दाखविलेल्या विश्वासाच्या बळावरच बँकेची घोडदौड सुरू आहे. ग्राहकांशी केवळ व्यवहाराचे नाते न ठेवता विश्वास, आपुलकी आणि सेवाभावाचे नाते निर्माण करण्याला बँकेने प्राधान्य दिले आहे. बँकेकडे सध्या सुमारे ३५० कोटी रुपयांच्या ठेवी असून ग्राहकांचा वाढता विश्वास हीच बँकेच्या कामाची खरी पावती आहे.

बँकेच्या विस्ताराबाबत माहिती देताना डॉ. पाटील यांनी हातकणंगले येथे लवकरच बँकेची नवीन शाखा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. बदलत्या बँकिंग व्यवस्थेत आधुनिक सेवा, ग्राहकाभिमुख सुविधा आणि विश्वासार्ह आर्थिक व्यवहार यांचा समन्वय साधत बँकेचा विस्तार करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात शिरोळच्या नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे, दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, बजरंग काळे गुरुजी, डी. आर. पाटील, सौ. रुपाली राजमाने, उद्योगपती सचिन माळी, प्रवीण माळी आदींनी मनोगत व्यक्त करून बँकेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रावीण्य मिळविलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच बँकेच्या ग्राहकांशी सातत्याने संपर्क ठेवून सेवा देणारे शाखाधिकारी पी. बी. तावदारे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वेग वाढत असताना ग्राहकांचा विश्वास, पारदर्शकता, तत्पर सेवा आणि सामाजिक बांधिलकी हीच सहकारी बँकिंगची खरी ताकद आहे. या मूल्यांच्या आधारावर श्री भरत अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने ४२ वर्षांची वाटचाल पूर्ण केली असून आगामी काळातही सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीला केंद्रस्थानी ठेवून बँकेने अधिक भक्कम वाटचाल करावी, असा सूर कार्यक्रमात व्यक्त झाला.

कार्यक्रमास बँकेचे सर्व संचालक, सभासद, ठेवीदार, ग्राहक, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी संचालक धनाजीराव मुळीक यांनी आभार मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!