पेटीला साडेसहा हजारांचा उच्चांकी भाव, सांगलीच्या विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये शिमला सफरचंदाची पहिली आवक

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी :

पश्चिम महाराष्ट्रातील फळ व भाजीपाला व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळख असलेल्या सांगली येथील विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये यंदाच्या हंगामातील शिमला सफरचंदाची पहिली आवक झाली. सांगलीतील सिद्धेश्वर उर्फ नाना तोडकर यांच्या ओम फ्रूट कंपनीमध्ये ही पहिली गाडी दाखल होताच व्यापाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. शेकडो व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या लिलावात सफरचंदाच्या एका पेटीला तब्बल साडेसहा हजार रुपयांचा उच्चांकी दर मिळाल्याने बाजारपेठेत या आवकेची विशेष चर्चा रंगली.

पहिल्या गाडीत एकूण ५८६ सफरचंदाच्या पेट्या दाखल झाल्या होत्या. प्रत्येक पेटीचे वजन सुमारे २५ ते ३० किलो इतके होते. लिलावादरम्यान दर्जेदार शिमला सफरचंदाला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या लिलावात प्रसिद्ध फळ विक्रेते गणेश कोळेकर यांनी साडेसहा हजार रुपये दराने पहिली पेटी खरेदी करून हंगामाचा शुभारंभ केला.

या पहिल्या आवकेसाठी सांगली, जयसिंगपूर, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर, विटा, इस्लामपूर, सातारा, कराड, जत, अथणी तसेच कर्नाटक सीमाभागातील अनेक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी ओम फ्रूटचे प्रोप्रायटर सिद्धेश्वर उर्फ नाना तोडकर यांनी सांगितले की, शिमला सफरचंद दर्जेदार, गोड व रसाळ असल्यामुळे ग्राहकांची त्याला नेहमीच पसंती असते. ही सफरचंदे तोडल्यानंतर कोणत्याही प्रकारचे कृत्रिम कुलिंग न करता अवघ्या चार ते पाच दिवसांत थेट बाजारात आणली जातात. त्यामुळे त्यांचा नैसर्गिक ताजेपणा, चव आणि गुणवत्ता कायम राहते. ग्राहकांपर्यंत ताजी आणि उत्कृष्ट दर्जाची फळे पोहोचावीत, यासाठी विशेष काळजी घेतली जाते, असेही त्यांनी नमूद केले.

हंगामाच्या पहिल्याच दिवशी शिमला सफरचंदाला मिळालेला उच्चांकी दर आणि व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यंदाच्या हंगामातही सफरचंद व्यापाराला चांगली गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!