राधानगरी धरणाचा ६ क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला; भोगावती नदीच्या पाणीपातळीत वाढीची शक्यता

Spread the love

कोल्हापूर / प्रतिनिधी

राधानगरी धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी गुरुवार, दि. 30 जुलै रोजी रात्री 11.32 वाजता धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक 6 उघडण्यात आला आहे.त्यामुळे भोगावती नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धरणाच्या सेवाद्वार क्रमांक 6 मधून 1,428 क्युसेक तर बीओटी (BOT) पॉवर हाऊसमधून 1,400 क्युसेक असा एकूण 2,828 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे नदीच्या प्रवाहात वाढ होणार असून सखल भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे व शेतीसाहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे तसेच मुलांना नदीकिनारी जाऊ न देण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्थानिक ग्रामपंचायती, महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, धरण परिसरात सुरू असलेल्या पावसाची तीव्रता आणि पाणलोट क्षेत्रातून होणारी आवक लक्षात घेऊन पुढील काळात विसर्गात आवश्यकतेनुसार बदल केला जाऊ शकतो. त्यामुळे भोगावती नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, असेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!