दहीहंडी खेळाडूंना शिरोळ नगरपरिषदेचे विमा सुरक्षा कवच,
कै.संभाजी आंबी दहीहंडी खेळाडू सुरक्षा कवच योजनेला मंजुरी;
घनकचरा प्रकल्प, अमृत २.०, अग्निशमन साहित्य, फॉगिंग मशीनसह विविध महत्त्वाच्या विषयांवर सर्वानुमते शिक्कामोर्तब
शिरोळ | प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाशी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेशी निगडित अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना बुधवारी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, शिरोळ शहराच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना प्रथमच विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय या सभेत घेण्यात आला. या योजनेला “कै. संभाजी आंबी दहीहंडी खेळाडू सुरक्षा कवच योजना” असे नाव देण्यात आले असून, दहीहंडी खेळाडूंच्या सुरक्षेसाठी नगरपरिषदेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
यासोबतच स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत शास्त्रीय कचरा भूमी केंद्र उभारण्यास मंजुरी, अमृत २.० पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचे अधिकार नगराध्यक्षांना प्रदान करणे, अग्निशमन विभागासाठी साहित्य खरेदी, नगरपरिषदेच्या आरोग्य विभागासाठी नवीन फॉगिंग मशीन खरेदी, पंचवार्षिक कर आकारणीसाठी मालमत्तांचे फेरसर्वेक्षण, विकासकामांचे त्रयस्थ लेखापरीक्षण आणि शिवराज्य भवनाच्या विद्युतीकरणासह विविध विकासात्मक विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.
बुधवार, दि. २९ रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषद कार्यालयातील कै. दिनकररावजी यादव सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे होत्या. प्रारंभी शहरातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करून सभेच्या कामकाजाला प्रारंभ करण्यात आला.
मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सभाध्यक्षांच्या परवानगीनंतर उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी प्रत्येक विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण देत मंजुरीसाठी सभागृहासमोर मांडणी केली. विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर सर्व प्रस्तावांना एकमताने मंजुरी देण्यात आली.
दहीहंडी खेळाडूंना प्रथमच विमा संरक्षण
शिरोळ शहर आणि तालुक्याला दहीहंडीची समृद्ध परंपरा लाभली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने युवक या स्पर्धेत सहभाग घेतात. मानवी मनोरे रचताना अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन नगरपरिषदेकडून खेळाडूंना विमा संरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. “कै. संभाजी आंबी दहीहंडी खेळाडू सुरक्षा कवच योजना” या नावाने ही योजना राबविण्यात येणार आहे.या योजनेमुळे दहीहंडी स्पर्धेदरम्यान अपघात झाल्यास खेळाडूंना आर्थिक संरक्षण मिळणार असून, खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार मिळेल. दहीहंडीसारख्या साहसी आणि पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देतानाच खेळाडूंच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारण्याचा नगरपरिषदेचा हा निर्णय राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीही आदर्श ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
घनकचरा व्यवस्थापनात शास्त्रीय पद्धतीचा अवलंब
स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत मंजूर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये शास्त्रीय कचरा भूमी केंद्र उभारण्यास सभेत मंजुरी देण्यात आली. या केंद्राच्या माध्यमातून अविघटीत कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील सुका, ओला आणि अविघटीत कचरा स्वतंत्रपणे वर्गीकृत करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, पर्यावरणपूरक आणि शाश्वत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नगरपरिषदेने उचललेले हे मोठे पाऊल असल्याची भावना सभेत व्यक्त करण्यात आली.
अमृत २.० योजनेसाठी नवीन सल्लागार
अमृत २.० पाणीपुरवठा योजनेचे विद्यमान प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांनी काम करण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे, ही योजना रखडू नये यासाठी तातडीने नवीन प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचे अधिकार नगराध्यक्षांना प्रदान करण्यात आले.पाणीपुरवठा योजनेची कामे वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना दर्जेदार पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सभेत स्पष्ट करण्यात आले.
अग्निशमन विभागासाठी आवश्यक साहित्य खरेदी
शहरातील आपत्कालीन परिस्थितींना अधिक प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यास सभेत मंजुरी देण्यात आली. आधुनिक उपकरणे आणि आवश्यक साहित्य उपलब्ध झाल्यानंतर अग्निशमन विभागाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
विकासकामांचे त्रयस्थ लेखापरीक्षण
नगरपरिषदेच्या सर्व विभागांमार्फत यापूर्वी करण्यात आलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सभेत घेण्यात आला. ज्या विकासकामांबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्या तक्रारींचे निराकरण झाल्याशिवाय संबंधित कामांचे देयक अदा करण्यात येऊ नये, असेही या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. यामुळे विकासकामांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होणार आहे.
मालमत्ता फेरसर्वेक्षणासंदर्भात कठोर भूमिका
नगरपरिषदेच्या पंचवार्षिक कर आकारणी प्रक्रियेसाठी शहरातील सर्व मालमत्तांचे फेरसर्वेक्षण सुरू आहे. हे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण न झाल्यास संबंधित सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास सभेने मंजुरी दिली. यामुळे मालमत्तेची अचूक नोंदणी, कर प्रणालीतील पारदर्शकता आणि नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शिवराज्य भवनाचे विद्युतीकरण व फर्निचर
शिरोळ नगरपरिषदेच्या शिवराज्य भवन इमारतीच्या बांधकामासाठी उपलब्ध असलेल्या अखर्चित निधीतून इमारतीचे विद्युतीकरण तसेच आवश्यक फर्निचरची कामे करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे इमारत अधिक कार्यक्षम व उपयोगी स्वरूपात नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.
पंचगंगा नदीवरील धोकादायक बंधाऱ्याबाबत पाठपुरावा
शहरातील पंचगंगा नदीवरील धोकादायक स्थितीतील बंधाऱ्याबाबत पाठबंधारे विभागाशी सातत्याने पत्रव्यवहार करून आवश्यक कार्यवाही करण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा असल्याचे सदस्यांनी नमूद केले.
आरोग्य विभागासाठी नवीन फॉगिंग मशीन
डासजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागासाठी नवीन फॉगिंग मशीन खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. ही खरेदी हिवताप अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असून, शहरातील प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला अधिक बळ मिळणार आहे.
विकास आराखड्यासंदर्भात कायदेशीर मार्गदर्शन
नगरपरिषदेच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत प्राप्त झालेल्या पत्रासंदर्भात कायदेशीर मार्गदर्शन घेण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. विकास आराखड्याची प्रक्रिया नियमबद्ध आणि कायदेशीर चौकटीत पूर्ण करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
सर्व विषयांना एकमताने मंजुरी
सभेदरम्यान उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी सर्व विषयांवर सविस्तर माहिती दिली. नगरसेवकांनी विविध विषयांवर सूचना आणि मते मांडली. चर्चेनंतर सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यामुळे नगरपरिषदेच्या विकासकामांना अधिक गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले.सभेस बांधकाम सभापती सौ. अनिता संकपाळ, महिला व बालकल्याण सभापती सौ. कल्पना काळे, आरोग्य सभापती विजय आरगे, नगरसेविका सौ. विदुला यादव, सुवर्णा कांबळे, अनुराधा गुरव, सौ. सविता पुजारी, रेखा कोरे, सौ. श्वेता जाधव तसेच नगरसेवक उल्हास आवळे, दीपक भाट, ओंकार गावडे, अमरसिंह पाटील, राहूल कोळी, अमर शिंदे, शाहूल कोळी, सचिन शिंदे, निलेश गावडे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
कचरा उठावासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन
सर्वसाधारण सभा संपल्यानंतर नगरपरिषदेच्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांची पदाधिकाऱ्यांशी ओळख करून देण्यात आली. उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी प्रत्येक प्रभागानुसार निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार कचरा संकलन आणि व्यवस्थापन प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांशी आदरपूर्वक संवाद साधत त्यांच्या समस्या तत्परतेने सोडविण्याचे आवाहनही त्यांनी केले. स्वच्छ शहर अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिक आणि कर्मचारी यांच्यात समन्वय राखण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी अधोरेखित केली.