नागाव येथे कचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न

Spread the love

नागाव येथे कचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

नागाव (ता. हातकणंगले) येथील माळवाडी परिसरातील रायगड ग्रुप परिसरात रस्त्याच्या कडेला साचलेला कचऱ्यामुळे परिसरात पसरलेल्या दुर्गंधीने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या कुजणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरत असून, नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.

माळवाडी भागातील रायगड ग्रुप परिसरात स्थानिक नागरिकांकडून रस्त्याकडेला कचरा टाकला जात असल्याने तिथे कचऱ्याचे ढीग ( कोंडाळा) तयार झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून माशा, डास आणि मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्यास गंभीर त्रास निर्माण होण्याची शक्यता 

झाली आहे. हा कचरा येथून हटवून आरोग्यविषयक धोका दूर करावा, यासाठी नागरिकांनी वीस दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयाकडे रितसर अर्ज दिला होता परंतु ग्रामपंचायतीने यावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कचऱ्यावर साचलेल्या पाण्यामुळे डास, माशा आणि विविध कीटकांचा उपद्रव वाढला आहे. परिणामी, साथीचे व डासजन्य आजार पसरून परिसरातील नागरिक व लहान मुलांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता राखणे ही ग्रामपंचायतीची मूळ जबाबदारी असतानाही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे ग्रामपंचायतीने तात्काळ या प्रकारची दखल घेऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी करावी, कचरा टाकणाऱ्या संबंधितांना समज देऊन सद्यस्थितीत साचलेला कचरा त्वरित उचलून घ्यावा आणि यापुढे तिथे कचरा टाकणार नाही याबाबत कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संतप्त नागरिकांमधून होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!