वारी म्हणजे संतांची व मानवतेची उज्वल परंपरा : अनिलराव यादव

Spread the love

वारी म्हणजे संतांची व मानवतेची उज्वल परंपरा : अनिलराव यादव

शिरोळात वारकरी पायी दिंडीचे उत्साहात स्वागत; पालखी पूजन, सत्कार व अल्पोपहाराचा उपक्रम

शिरोळ / प्रतिनिधी 

आषाढी वारीच्या पवित्र पार्श्वभूमीवर बेनाडीहून पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकरी दिंडीचे शिरोळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांच्या पुढाकाराने टारे हॉल येथे वारकऱ्यांसाठी अल्पोपहार व चहाची व्यवस्था करण्यात आली. तसेच दिंडीतील पालखीचे पूजन, दिंडी प्रमुखांचा सत्कार आणि वारकऱ्यांचा सन्मान करून भक्तिमय वातावरण निर्माण करण्यात आले.

यावेळी बोलताना अनिलराव यादव म्हणाले, “पंढरपूरची आषाढी वारी हा केवळ धार्मिक सोहळा नसून अध्यात्म, संस्कार, समता, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी उत्सव आहे. लाखो वारकरी विठ्ठल नामाचा अखंड गजर करत शिस्त, संयम, सेवाभाव आणि भक्तीची परंपरा जपत पंढरीची वाट चालतात. वारकरी दिंडी ही संतांची, समतेची आणि मानवतेची उज्ज्वल परंपरा असून ती समाजाला एकात्मता आणि सद्भावनेचा संदेश देणारी आहे.”

यादव परिवाराच्या वतीने दिंडीतील पालखीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दिंडी प्रमुखांना मानाचा फेटा बांधून शाल देत त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर सर्व वारकऱ्यांना प्रेमपूर्वक अल्पोपहार व चहाचे वाटप करण्यात आले. या स्वागत सोहळ्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमास बाळासाहेब चव्हाण, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव चव्हाण, यादव सोसायटीचे चेअरमन दगडू चव्हाण, शक्तीजीत गुरव, उदय संकपाळ, सुनील फल्ले, संतोष बन्ने, डी. आर. कोळी, पत्रकार बाळासाहेब माळी, चंद्रकांत भाट, दिलीप कोळी, उदय संकपाळ शिलेदार, उल्हास पाटील, साजिद शेख, तुकाराम पाटील, राजेंद्र माने, बबन पुजारी, दरगू पाटील, इस्माईल चौगुले, सयाजी पाटील, दीपक गावडे, रावसाहेब समडोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम ठरलेल्या या स्वागत सोहळ्याने वारकरी संप्रदायातील समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ केला. आषाढी वारीच्या निमित्ताने शिरोळमध्ये निर्माण झालेले भक्तिमय वातावरण सर्वांच्या स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Comment

error: Content is protected !!