शिरोळ | प्रतिनिधी
विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल, मौजे आगर येथे विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सॅनिटरी पॅड डिस्पोजेबल मशीन प्रदान सोहळा उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना मासिक पाळीदरम्यान सुरक्षित व स्वच्छ सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरुंदवाड येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. धनश्री गायकवाड उपस्थित होत्या. शरद इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज, यड्राव येथील प्रा. सौ. माधुरी माळी यांच्या हस्ते विद्यालयाला सॅनिटरी पॅड डिस्पोजेबल मशीन प्रदान करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयाच्या शिक्षिका सौ. जयश्री पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.
प्रा. माधुरी माळी यांनी मनोगतात मासिक पाळीदरम्यान मुलींच्या आरोग्याची सुरक्षितता ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सॅनिटरी पॅड डिस्पोजेबल मशीनमुळे वापरलेल्या पॅडची सुरक्षित विल्हेवाट लागण्यास मदत होईल. त्यामुळे स्वच्छता राखली जाईल, संसर्गाचा धोका कमी होईल आणि पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागेल, असे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात सौ. धनश्री गायकवाड यांनी विद्यार्थिनींना मशीनच्या वापराची माहिती देत मासिक पाळीबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले. तसेच स्वच्छता आणि आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी डॉ. सौ. पायल माने यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळीदरम्यान घ्यावयाचा सकस आहार, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास समुपदेशक सौ. ऋतुजा शेट्टी, उद्योजक सचिन माळी, सामाजिक कार्यकर्ते रविकिरण गायकवाड, सौ. नम्रता जाधव, सौ. कविता लाड, सौ. सुषमा मोरे, सौ. सुप्रिया कांबळे, डॉ. दिपाली बंडगर, विद्यालयाचे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन बागुल यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुप्रिया दाभाडे यांनी मानले. विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करून कौतुक केले.