नागाव स्मशानभूमीत अघोरी जादूटोण्याचा प्रकार; महिलेचा फोटो, बाहुली आणि अंड्यावर नाव आढळून आल्याने खळबळ
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
नागाव (ता. हातकणंगले) येथील एमआयडीसी पहिल्या फाट्यावरील स्मशानभूमीत अज्ञात व्यक्तीकडून जादूटोणा किंवा भानामतीचा अघोरी प्रकार करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. असे प्रकार रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने परिसरात सिसिटिव्ही काॅमेरे बसवणे गरजेचे आहे .
नागाव येथील एमआयडीसी पहिला फाटा हायवेलगत असलेली ही स्मशानभूमी शिरोली, नागाव, यादववाडी परिसरातील अंत्यसंस्कारासाठीचे मुख्य ठिकाण असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. मात्र, स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ आणि आजूबाजूला झाडी असल्याने आत काय चालले आहे हे बाहेरून दिसत नसल्याने या परिस्थितीचा गैरफायदा घेत हा अघोरी प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. येथे दिसून आलेल्या संशयास्पद वस्तूंवरून हा प्रकार मंगळवारी अमावस्येच्या रात्री घडला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
स्मशानभूमीच्या लोखंडी शवदाहिनीच्या जाळीवर बाहुलीला बिबा लाल दोऱ्याने बांधून ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर, शवदाहिनीच्या दोन्ही कोपऱ्यांत शेंडी नसलेले दोन नारळ, त्यापैकी एक फोडून ठेवलेला, आढळून आले. याशिवाय, एका लिंबावर व एका अंड्यावर आरती रमेश माने हे नाव लाल रंगाने लिहून त्या महिलेला फोटो ठेवत अघोरी विधी केल्याचे स्पष्ट दिसत आहे. या अंधश्रद्धेतून केले जाणाऱ्या प्रकारामुळे सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक आहेत.
स्मशानभूमीसारख्या ठिकाणी अशा प्रकारे नारळ , लिंबू , अंड , बाहुली , बिबा व महिलेचा फोटो वापर करून विधी केल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या समाजकंटकांचा प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहीजे यासाठी ग्रामपंचायतीने परिसरात सिसिटिव्ही काॅमेरे बसवण्याची गरज आहे .