पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरोधात मोठी कारवाई केली असून महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ५५ अन्वये टोळीप्रमुखासह तिघांना एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे, बेकायदेशीर अग्निशस्त्रे व जिवघेणी शस्त्रे बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक आप्पासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अर्जुन गायकवाड व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईत टोळीप्रमुख अविनाश अनिल कोळी (वय ३५, रा. शिरोली ग्रामपंचायतजवळ, शिरोली पुलाची) याच्यासह श्रीकांत तानाजी मोहिते (वय ३४, रा. समता परिसर, शिरोली पुलाची) आणि कार्तिक परशुराम राजुगरीकर (वय ३१, रा. विलासनगर, माळवाडी, शिरोली पुलाची) यांना एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
दरम्यान, या टोळीतील अन्य सदस्य अनिकेत आनंदा कांबळे व ऋषिकेश उर्फ प्रताप शिवाजी भोरे हे वडगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात अटक असून सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच अली उर्फ जमीर बालेचॉद तानेखान हा फरार असून, तो अटक झाल्यानंतर अथवा न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्याच्याविरोधातही हद्दपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याने अलीकडील काळात सराईत गुन्हेगारांवर सातत्याने प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या असून, परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अशा कारवाया भविष्यातही सुरू राहतील, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.