शिरोळ / प्रतिनिधी
सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय व दीर्घकालीन योगदानाची दखल घेत मा. आमदार विनय कोरे (सावकार) यांना प्रदान करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या ‘सहकार भूषण’ पुरस्काराबद्दल श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व्यक्त करत पुढील सामाजिक व सहकार क्षेत्रातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी गणपतराव पाटील यांनी सांगितले की, आमदार विनय कोरे यांनी सहकार चळवळ अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख करण्यासाठी सातत्याने केलेले कार्य प्रेरणादायी आहे. शेतकरी, सभासद आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळाली असून, त्यांच्या कार्याची दखल म्हणून मिळालेला ‘सहकार भूषण’ पुरस्कार हा संपूर्ण सहकार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे.
यावेळी त्यांनी सहकार चळवळीला अधिक बळकटी देत समाजहिताचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात घडत राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली. तसेच लोकहित, विकास आणि सहकार या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आमदार विनय कोरे यांचे नेतृत्व भविष्यातही समाजासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार विनय कोरे यांनी शुभेच्छांसाठी गणपतराव पाटील यांचे आभार मानत, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण विकास, शेतकरी सक्षमीकरण आणि सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी आपले प्रयत्न यापुढेही अधिक जोमाने सुरू राहतील, अशी भावना व्यक्त केली.
या भेटीदरम्यान दोन्ही मान्यवरांमध्ये सहकार चळवळीचे भवितव्य, ग्रामीण विकासाची दिशा आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांबाबत सकारात्मक चर्चा झाली. सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा झालेला हा गौरव अनेक कार्यकर्ते, सहकारी संस्था आणि युवा नेतृत्वासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.