१४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; शेतकरी व वाहतूकदारांना सहकार्याचे आवाहन, श्री दत्त साखर शिरोळमध्ये मिल रोलर पूजन

Spread the love

श्री दत्त साखर शिरोळमध्ये मिल रोलर पूजन उत्साहात

2026-27 गळीत हंगामासाठी 14 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; शेतकरी व वाहतूकदारांना सहकार्याचे आवाहन

शिरोळ / प्रतिनिधी

श्री दत्त साखर कारखाना, शिरोळ येथे 2026-27 च्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.यावेळी आगामी गळीत हंगामासाठी कारखान्याने 14 लाख टन ऊस गाळपाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केल्याची घोषणा करण्यात आली.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना गणपतराव पाटील म्हणाले,कारखान्याची प्रगती ही सभासद शेतकरी,ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार आणि कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या सामूहिक योगदानातूनच शक्य आहे.कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासदांनी आपला संपूर्ण ऊस श्री दत्त साखर कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे.तसेच ऊस तोडणी व वाहतूकदारांनी मोठ्या प्रमाणात करार करून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

आगामी गळीत हंगाम सुरळीत व कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी कारखान्यातील सर्व यंत्रसामग्रीची देखभाल,दुरुस्ती आणि तांत्रिक तयारी युद्धपातळीवर सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदारांशी करार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून,त्यांना उचल रक्कम देण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.त्यामुळे हंगामाच्या प्रारंभापासूनच ऊस वाहतूक आणि गाळप प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक अनिलकुमार यादव, बाबासो पाटील, रणजित कदम, इंद्रजित पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, ॲड. प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगू माने गावडे, सिदगोंडा पाटील, सुरेश कांबळे, महेंद्र बागे, विजय सूर्यवंशी, प्रदीप बनगे, बाळासाहेब पाटील-हालसवडे, रावसाहेब नाईक यांच्यासह कार्यकारी संचालक संजीव देसाई, सचिव अशोक शिंदे, वर्क्स मॅनेजर एस. ए. चौगुले, प्रॉडक्शन मॅनेजर एम. एस. जाधव तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

सहकार,आधुनिक तांत्रिक तयारी आणि शेतकरी हिताला प्राधान्य देत श्री दत्त साखर कारखाना यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्याच्या दिशेने भक्कम पावले टाकत असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.

Leave a Comment

error: Content is protected !!