आंतरराष्ट्रीय चित्रकला ऑलिम्पियाडमध्ये श्रीतेज सुतारचा सुवर्णवेध
सुवर्णपदकासह शिष्यवृत्तीची कमाई; छत्रपती शाहू विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
कुरुंदवाड / प्रतिनिधी
इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड आणि इंडियन टॅलेंट ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रकला ऑलिम्पियाड परीक्षेत कुरुंदवाड येथील छत्रपती शाहू विद्यालयाचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी श्रीतेज प्रमोद सुतार याने उल्लेखनीय यश संपादन करत सुवर्णपदक पटकाविले आहे. या उज्ज्वल कामगिरीबद्दल त्याला इंडियन टॅलेंट ग्रुपकडून शिष्यवृत्तीही जाहीर करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय फेरीनंतर झालेल्या या आंतरराष्ट्रीय चित्रकला ऑलिम्पियाड परीक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. उत्कृष्ट कलादृष्टी, कल्पकता आणि रंगसंगतीच्या जोरावर श्रीतेजने स्पर्धेत आपला ठसा उमटवत सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याच्या या यशामुळे विद्यालयासह कुरुंदवाड परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.
श्रीतेजच्या या यशामागे विद्यालयाचे कलाशिक्षक पुरुषोत्तम सरनाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यालयाच्या प्राचार्या दिपाली उपाध्ये यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्याचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला. याशिवाय, आई व कला शिक्षिका स्वाती सुतार तसेच वडील प्रमोद सुतार यांनी सातत्याने दिलेल्या पाठबळामुळे हे यश शक्य झाल्याची भावना श्रीतेजने व्यक्त केली.
विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला वाव देणाऱ्या अशा स्पर्धांमुळे कलाक्षेत्रातील गुणांना नवी दिशा मिळत असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले. श्रीतेजच्या या यशामुळे छत्रपती शाहू विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून इतर विद्यार्थ्यांनाही त्याच्या यशातून प्रेरणा मिळणार आहे. विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी श्रीतेजवर अभिनंदनाचा वर्षाव करत त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.