शाहुवाडीतील शाखा अभियंता ३८ हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

Spread the love
शाहुवाडी / प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभाग, शाहुवाडी येथील शाखा अभियंता विजयकुमार विलास वनमोरे (वय ५०) याला ३८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कोल्हापूर पथकाने रंगेहाथ पकडले.या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली असून शाहुवाडी पोलीस ठाण्यात आरोपी अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तक्रारदार हे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंजूर होणारी रस्ते,गटारी व पुलांची कामे मुख्य ठेकेदारांकडून उपठेकेदार म्हणून पूर्ण करून देतात. त्यांनी शिराळे वारूण येथील पुलाचे तसेच कर्नाळवाडी (धनगरवाडा) ते सोनारवाडी (विरळे) या सुमारे दोन किलोमीटर रस्त्याच्या मुरमीकरण व खडीकरणाचे काम पूर्ण केले होते. या दोन्ही कामांची बिले मंजूर करून दिल्याच्या मोबदल्यात वनमोरे यांनी सुरुवातीला ३४ हजार ७०० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर तक्रारदारांनी एसीबी, कोल्हापूर कार्यालयात धाव घेत तक्रार दाखल केली.
एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपी अधिकाऱ्याने दोन्ही कामांची बिले मंजूर केल्याच्या बदल्यात ३८ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचला. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारदारांकडून ३८ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच शाखा अभियंता विजयकुमार वनमोरे यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.
या प्रकरणी आरोपी विजयकुमार विलास वनमोरे (मूळ रा. संजय अपार्टमेंट, कोयना वसाहत, कराड, जि. सातारा; सध्या रा.अकोली रोड, शाहुवाडी, जि. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध शाहुवाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अप्पर  पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने, संदीप काशीद, पोलीस नाईक सचिन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल उदय पाटील व प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली.
दरम्यान, लाचेची मागणी किंवा अपसंपदेबाबत कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी तातडीने संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन एसीबीने केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!