शिरोळ / प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ शिरोळच्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर डे आणि कृषी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. समाजाच्या आरोग्य आणि अन्नसुरक्षेसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या शहरातील डॉक्टर तसेच प्रगतशील शेतकऱ्यांचा यावेळी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.या उपक्रमामुळे समाजातील दोन महत्त्वाच्या घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
येथील टारे सभागृहात बुधवारी आयोजित कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष दिनेश माने-गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.रोटरी क्लबच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक बांधिलकी आणि जनहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना मान्यवरांनी रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सेवा, सन्मान आणि सामाजिक जाणीव जागृत करण्याचे कार्य रोटरी प्रभावीपणे करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. विरश्री पाटील, रोटरीचे पंडित काळे, नितीन शेट्टी आणि चिमासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. डॉक्टर आणि शेतकरी हे समाजाचे खरे आधारस्तंभ असून त्यांच्या कार्याचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास रोटरी क्लबचे डॉ. अंगराज माने, बाळासाहेब शेट्टी, सचिन देशमुख, श्रीकांत शिरगुप्पे, अतुल टारे, विजय माळी, अमित पोतदार, बापूसो गंगधर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.शेवटी युवराज जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
डॉक्टर डे आणि कृषी दिनाचे औचित्य साधून समाजसेवेची भावना वृद्धिंगत करणारा हा उपक्रम शिरोळमध्ये कौतुकाचा ठरला.