जयसिंगपूर / प्रतिनिधी
निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील शेतामध्ये सुरू असलेल्या गावठी दारू हातभट्टीवर जयसिंगपूर पोलिसांनी धाड टाकून तब्बल १ लाख ८६ हजार ९०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत निमशिरगाव येथील चांभार कोडी परिसरातील रमेश सिताराम कांबळे यांच्या शेतातील गट क्रमांक ३०४ च्या बांधावरील करंजीच्या झाडाखाली गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार आज (दि.१ जुलै) दुपारी सुमारे १.४५ वाजता पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जालिंदर पाटील,पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पवार,पोलीस नाईक रूपेश कोळी,ताहिर मुल्ला,दानोळीचे पोलीस पाटील प्रशांत नेजकर व निमशिरगावचे पोलीस पाटील रामचंद्र सासणे यांनी संयुक्त कारवाई केली.छाप्यात चार बॅरलमध्ये सुमारे ८०० लिटर गरम कच्चे रसायन,चार जुने लोखंडी बॅरल,चार प्लास्टिक सरपोच पाईप,९५ प्लास्टिक पोत्यांमध्ये साठवलेले पक्के रसायन,चार जर्मन डब्यांतील सुमारे ८० लिटर तयार गावठी दारू,सहा प्लास्टिक पोत्यांमध्ये भरून ठेवलेली तयार दारू,चार जर्मन डबे, ९५ प्लास्टिक पोती तसेच जळाऊ लाकूड असा एकूण १,८६,९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी सावकार माने व सचिन मदने,दोघेही यांच्याविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावठी दारू निर्मिती व विक्रीविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून,पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत.