पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिये फाट्यावर ट्रकची दुचाकीस धडक बसून तरुण जागीच ठार

Spread the love

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिये फाटा येथील उड्डाणपुलावर आज सकाळी एक भीषण अपघात झाला. एका भरधाव मालवाहू टेम्पोने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. हा अपघात आज सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.अपघात मयत तरूणाचे नाव सौरभ सुरेंद्र फडतरे (वय २७, मूळ रा. हरळी, ता. गडहिंग्लज, सध्या रा. संभाजीनगर, कोल्हापूर) असे आहे. सौरभ हा पॅकिंग मशीन रिपेअरिंगचे काम करायचा. आज सकाळी सांगली जिल्ह्यातील विटा येथील एका ग्राहकाचा मशीन दुरुस्तीचा फोन आल्यामुळे तो आपल्या दुचाकीने (क्र. MH 09 EB 2343) विटा गावाकडे निघाला होता.तो शिये फाटा येथील उड्डाणपुलावर पोहोचला असता, पाठीमागून आलेल्या मालवाहू टेम्पोने (क्र. KA 27 A 3957) त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की सौरभ टेम्पोसोबत काही अंतरापर्यंत फरफटत गेला. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.या अपघाताची माहिती मिळताच शिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. अपघातामुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी तात्काळ पावले उचलत वाहतूक पूर्ववत केली.सौरभचे कुटुंबीय मूळचे रामनगर (बेळगाव, कर्नाटक) येथील असून त्याचे वडील गडहिंग्लज जवळील हरळी येथील साखर कारखान्यात कामाला होते. तेथून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते कोल्हापूरमधील संभाजीनगर येथे स्थायिक झाले होते. काही वर्षांपूर्वी सौरभच्या वडिलांचेही निधन झाले होते. कुटुंबात सौरभ, त्याची आई आणि बहीण हे तिघेच राहत होते. घराचा मुख्य कमावता आधार असलेल्या सौरभच्या अशा अचानक जाण्याने फडतरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!