शिरोळ | प्रतिनिधी
समाजाच्या सुख-दुःखात स्वतःला झोकून देणारी माणसे विरळाच असतात. आपल्या कार्यातून, विचारातून आणि निस्वार्थ सेवाभावातून समाजमनावर अमिट ठसा उमटवणारी काही व्यक्तिमत्त्वे काळाच्या ओघात आदर्श ठरतात.शिरोळच्या सामाजिक, शैक्षणिक,पत्रकारिता आणि लोकहिताच्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे सातत्याने कार्यरत असलेले पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तुकाराम भाट हे असेच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संघर्षमय,कर्तृत्ववान आणि समाजभिमुख जीवनप्रवासाचा घेतलेला हा विशेष आढावा.
संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्त्व
४ जून १९८० रोजी शिरोळ येथील अत्यंत सामान्य कुटुंबात चंद्रकांत भाट यांचा जन्म झाला.आर्थिकदृष्ट्या हलाखीची परिस्थिती,कष्टमय जीवन आणि लहान वयातच आलेले संकट यामुळे त्यांचे बालपण संघर्षमय ठरले. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र या संकटांनी त्यांना खचवले नाही; उलट जीवनातील प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जाण्याची ताकद दिली.आईच्या कष्टातून, शिक्षकांच्या मार्गदर्शनातून आणि मित्रांच्या आधारातून त्यांनी जीवनाचे धडे घेतले. गरिबी, संघर्ष आणि प्रतिकूल परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे समाजातील दुर्बल घटकांविषयी त्यांच्या मनात विशेष संवेदनशीलता निर्माण झाली. “स्वतःच्या वाट्याला आलेले दुःख इतरांच्या वाट्याला येऊ नये” ही भावना त्यांच्या समाजकार्यातील प्रेरणाशक्ती ठरली.
समाजसेवेलाच आयुष्य अर्पण
नोकरीच्या मागे न लागता समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्धार त्यांनी लहानपणापासूनच केला. समाजातील गोरगरीब, वंचित, उपेक्षित आणि गरजू घटकांसाठी काम करताना त्यांनी कधीही प्रसिद्धीची अपेक्षा ठेवली नाही.एखाद्या कुटुंबावर संकट आले, एखाद्या विद्यार्थ्याला मदतीची गरज भासली किंवा एखाद्या नागरिकाचा न्यायाचा प्रश्न निर्माण झाला तर सर्वप्रथम धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. सामाजिक कार्य हे केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित न ठेवता त्यांनी ते जीवनमूल्य म्हणून स्वीकारले. दुःखाच्या प्रसंगी दिलासा देणे, गरजूंच्या पाठीशी उभे राहणे, समाजातील विविध घटकांमध्ये समन्वय निर्माण करणे आणि सर्वांना आपलेसे वाटेल अशी कार्यपद्धती जोपासणे ही त्यांची खासियत ठरली. आपली आई व लहान बंधू यांच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून आपल्या कुटुंबाचे पालकत्व खंबीरपणे सांभाळून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांना नेहमीच त्यांच्या मित्र परिवाराची खंबीर साथ लाभत आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून लोकसेवा
समाजकार्य करत असतानाच पत्रकारिता क्षेत्रात प्रवेश करण्याची संधी त्यांना मिळाली.सुमारे दोन दशकांपूर्वी त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात पदार्पण केले. प्रारंभी दैनिक जनप्रवास मधून पत्रकारितेची सुरुवात करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.आर्थिक अडचणी,स्पर्धा आणि मर्यादित साधने असूनही त्यांनी जिद्द सोडली नाही.यानंतर त्यांनी दैनिक प्रतिध्वनी,दैनिक राष्ट्रगीत, दैनिक महान कार्य, दैनिक लोकनेता, साप्ताहिक मंत्रपुष्प अशा विविध वृत्तपत्रांमध्ये काम करत अनुभवाची समृद्ध शिदोरी जमा केली.सतत वाचन,अभ्यास आणि जनसंपर्क यांच्या बळावर त्यांनी पत्रकारितेतील आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.आज ते दैनिक नवा महाराष्ट्रमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत असून पत्रकारितेला लोकसेवेचे प्रभावी माध्यम बनवण्याचे काम करीत आहेत.
निर्भीड आणि अभ्यासू पत्रकार
पत्रकारिता म्हणजे केवळ बातमी देणे नव्हे तर समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणे,अन्यायाविरोधात आवाज उठवणे आणि लोकहितासाठी लेखणी चालवणे असे ते मानतात. त्यामुळे त्यांनी नेहमीच सत्य, प्रामाणिकपणा आणि निःपक्षपातीपणाला प्राधान्य दिले.शिरोळ तालुक्यातील सामाजिक,राजकीय, शैक्षणिक आणि विकासात्मक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने लेखन केले. सामान्य नागरिकांच्या अडचणींना केंद्रस्थानी ठेवून पत्रकारिता केल्यामुळे त्यांची लेखणी लोकाभिमुख ठरली.दबाव, प्रलोभने किंवा राजकीय समीकरणांपुढे झुकण्याऐवजी सत्याची बाजू मांडण्याचे धैर्य त्यांनी कायम राखले.
महापूर आणि कोरोनाकाळातील मोलाचे योगदान
शिरोळ तालुक्यावर आलेल्या महापुराच्या संकटावेळी त्यांनी अक्षरशः दिवस-रात्र पूरग्रस्तांच्या मदतीसाठी झटले.बचावकार्य, निवारा केंद्रांची व्यवस्था,अन्नधान्य पुरवठा आणि मदत समन्वय यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रोटरी क्लबच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी भोजन व्यवस्था उभारण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.कोरोना महामारीच्या काळात तर त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरले. रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, औषधांची व्यवस्था करणे, प्रशासनाशी समन्वय साधणे आणि वेळेवर उपचार मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. अनेकांच्या जीविताचे संरक्षण करण्यात त्यांच्या कार्याचा मोलाचा वाटा राहिला. या काळात स्वतःच्या आईचा मृत्यू झाला त्याचे दुःख बाजूला सारून त्यांनी इतरांचे जीव वाचावेत यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.शिरोळ शहरात लहान मुलांसाठी कोरोना केअर सेंटर उभारण्याच्या उपक्रमातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या या कार्याची दखल घेत विविध संस्थांनी त्यांना “कोविड योद्धा” म्हणून गौरविले.
शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न
शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन असल्याची ठाम भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे मिळवून देणे, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे अशा अनेक उपक्रमांत ते सक्रिय असतात.विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान अनेक कुटुंबांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
सामाजिक संस्थांमधील सक्रिय नेतृत्व
पत्रकारिता आणि समाजकार्याबरोबरच विविध सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. राजाराम विद्यालय क्रमांक २ च्या शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे खजिनदार, पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, विविध सामाजिक मंडळांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.समाजातील प्रत्येक घटकाशी सुसंवाद राखण्याची त्यांची क्षमता विलक्षण आहे. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, प्रशासन, व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्याशी त्यांनी जपलेले विश्वासाचे नाते हे त्यांच्या कार्याची खरी ताकद आहे.
पुरस्कारांनी गौरवलेले कार्य
पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.त्यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श पत्रकार गौरव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आत्मसन्मान गौरव, भीम कायदा आदर्श पत्रकार पुरस्कार, बसवभूषण आदर्श पत्रकार पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार यांसह विविध सन्मानांचा समावेश आहे.हे पुरस्कार त्यांच्या कार्याचा केवळ गौरव नसून समाजहितासाठी केलेल्या समर्पित प्रयत्नांची पोचपावती आहेत.
माणुसकी जपणारा लोकाभिमुख चेहरा
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात स्वतःच्या स्वार्थापेक्षा समाजहिताला प्राधान्य देणारी व्यक्तिमत्त्वे दुर्मिळ होत चालली आहेत. अशा काळात चंद्रकांत भाट यांनी समाजकारण, पत्रकारिता आणि माणुसकी यांचा सुंदर संगम घडवून आणला आहे.सुखाच्या क्षणी नव्हे तर संकटाच्या वेळी धावून येणारा, गरजूंना आधार देणारा, सत्यासाठी निर्भीडपणे उभा राहणारा आणि समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे वाटणारा माणूस अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
सत्यनिष्ठ पत्रकारिता,निस्वार्थ समाजसेवा आणि लोकहिताचा अखंड ध्यास या त्रिसूत्रीवर आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे पत्रकार चंद्रकांत भाट हे शिरोळच्या सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. त्यांच्या कार्यातून अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे.समाजभान जपत लोकहितासाठी अखंड झटणाऱ्या या संवेदनशील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्याला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या कार्यातून समाजसेवेचा हा दीप अधिक तेजाने प्रज्वलित होत राहो, हीच सदिच्छा.