तवेरा ट्रायल ठरली जीवघेणी! गाडी पलटी होऊन तरुण मिस्त्रीचा जागीच मृत्यू; तिघे गंभीर जखमी

Spread the love
पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे 
कावळा नाका परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुरुस्ती केलेल्या तवेरा वाहनाची ट्रायल घेण्यासाठी गेलेल्या तरुण मिस्त्रीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले.या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.मृत तरुणाचे नाव दुर्गाप्रसाद हुवाप्पा इडी (वय 26, रा. कावळा नाका, मूळ रा. लोकापूर, कर्नाटक) असे आहे. ते वाहन दुरुस्तीचे काम करत होते. बुधवारी दुरुस्तीसाठी आलेली तवेरा गाडी पूर्णपणे दुरुस्त केल्यानंतर तिची स्थिती तपासण्यासाठी गाडीच्या मालकासह एकूण चौघेजण ट्रायलसाठी बाहेर पडले होते.मात्र काही अंतरावर गेल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तवेरा भरधाव वेगात जाऊन पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा चक्काचूर झाला. यात दुर्गाप्रसाद यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अन्य तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली असून पुढील तपास सुरू आहे.जखमींची नावे उशिरापर्यंत समजू शकली नव्हती.दुर्गाप्रसाद हे मूळचे कर्नाटकातील लोकापूर येथील रहिवासी होते.गेल्या अनेक वर्षांपासून ते कावळा नाका परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दीड वर्षांचा मुलगा, एक भाऊ आणि तीन बहिणी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारवड असलेल्या दुर्गाप्रसाद यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.विशेषतः दीड वर्षांच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून पितृछत्र हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे.मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांनी सीपीआर रुग्णालयात धाव घेतली. पत्नी व नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.दरम्यान,अपघातस्थळी एकेरी वाहतूक सुरू असल्याने निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे हा अपघात घडला असावा, अशी शक्यता काही नागरिकांनी व्यक्त केली.

Leave a Comment

error: Content is protected !!