शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याची मागणी; टाळाटाळ झाल्यास मोर्चाचा इशारा

Spread the love

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे

शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी,अन्यथा अतिक्रमणधारकांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात येईल,असा इशारा श्री शाहू स्वाभिमानी आघाडी व अतिक्रमणधारकांनी दिला आहे. याबाबत ग्रामपंचायत पुलाची शिरोलीच्या सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ तसेच शासनाच्या विविध निर्णयांनुसार शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचे धोरण राज्य शासनाने जाहीर केले आहे. ग्रामीण व शहरी भागातील अतिक्रमणधारकांना न्याय मिळावा आणि “सर्वांसाठी घरे” या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनाने सुधारित व एकत्रित आदेश जारी केले आहेत.मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाकडून अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी आवश्यक हालचाली होताना दिसत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अतिक्रमणधारकांना रहिवासी पुरावा व घरठाण उतारे मिळविण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असून, ग्रामपंचायत दप्तरी नोंदी उपलब्ध असतानाही नागरिकांना अनावश्यक त्रास दिला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.सन २०१८-१९ मध्ये ऑनलाईन नोंद झालेली तसेच काही कारणास्तव नोंद न झालेली अतिक्रमणे फेरतपासणी करून नियमित करावीत,अशी मागणीही करण्यात आली आहे.अतिक्रमणधारकांना आवश्यक कागदपत्रे सहज उपलब्ध व्हावीत यासाठी ग्रामपंचायतीने स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.ग्रामपंचायत प्रशासनाने या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा अतिक्रमणधारकांच्या वतीने तीव्र आंदोलन व धडक मोर्चा काढण्यात येईल,असा इशारा श्री शाहू स्वाभिमानी आघाडीने दिला आहे.यावेळी निवेदन देताना माजी जि.प.सदस्य महेश चव्हाण, माजी उपसरपंच सुरेश यादव,अनिल खवरे,नितीन चव्हाण,संतोष बाटे, राजकुमार पाटील,मुकुंद नाळे,नितीन दळवी,शिवाजी पवार (पाटील) , अशोक खोत,आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!