शिरोळ / प्रतिनिधी
विवाह नोंदणी ही प्रत्येक विवाहित जोडप्यासाठी कायदेशीरदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून नागरिकांना ही सुविधा सहज व सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावी या उद्देशाने शिरोळ नगरपरिषद व ग्रामीण रुग्णालय शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत विवाह नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शिरोळ नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.विविध शासकीय योजना,वारसाहक्क,विमा दावे,पासपोर्ट, व्हिसा,बँकिंग व्यवहार,मालमत्ता हक्क, न्यायालयीन प्रक्रिया तसेच इतर अनेक प्रशासकीय कामांसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक ठरते. अनेकदा नागरिकांना विवाह नोंदणी प्रक्रियेची माहिती नसल्याने किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते.ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना एकाच ठिकाणी मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. नगरपालिका कार्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरामध्ये विवाह नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या नियमांची,प्रक्रियेची आणि कागदपत्रांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तसेच विवाह नोंदणी अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी आणि इतर तांत्रिक बाबींविषयीही नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांची वेळ आणि खर्चाची बचत होणार असून विवाह नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक होणार आहे.शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यामध्ये वधू-वर यांचे ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र, वधू-वराचा वयाचा दाखला,प्रत्येकी सहा पासपोर्ट साईज फोटो,रेशनकार्डची झेरॉक्स प्रत,लग्नपत्रिका,लग्नाचा समूह फोटो, रहिवासी पुराव्याची स्वसाक्षांकित प्रत, वधू-वर यांचे ओळखपत्राची स्वसाक्षांकित प्रत यांचा समावेश आहे.याशिवाय विवाह नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या साक्षीदारांची माहिती देखील सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक साक्षीदाराचे तीन आयडेंटी साईज रंगीत फोटो तसेच त्यांचा ओळखीचा स्वसाक्षांकित पुरावा सादर करावा लागणार आहे.तसेच विवाह सोहळा पार पाडणाऱ्या पुरोहित यांचा एक आयडेंटी साईज रंगीत फोटो, वीज बिलाची झेरॉक्स प्रत आणि आवश्यक ओळख पुरावे सादर करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने नागरिकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून विवाह नोंदणी प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील अनेक कुटुंबांनी अद्याप विवाह नोंदणी केलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे.अशा नागरिकांना कायदेशीरदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि भविष्यातील संभाव्य अडचणी टाळण्यासाठी या शिबिराचे विशेष महत्त्व असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.नगरपरिषद प्रशासनाने सर्व नागरिकांना निर्धारित वेळेत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शिरोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.योगिता कांबळे,उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव तसेच ग्रामीण रुग्णालय शिरोळच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. उषा चोले यांनी संयुक्तपणे नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.विवाह नोंदणीसारखी महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया नागरिकांना त्यांच्या परिसरातच सहज उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न निश्चितच उपयुक्त ठरणार असून यामुळे नागरिकांमध्ये कायदेशीर जागरूकता वाढण्यासही मदत होणार आहे. प्रशासनाच्या या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन विवाह नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.