शिरोळ | प्रतिनिधी
सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून समाजातील मूल्यांना बळ देण्याची परंपरा शिरोळकरांनी सातत्याने जपली आहे.या परंपरेला पुढे नेत आमदार दलित मित्र डॉ.अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिरोळ भूषण पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात आणि भव्य स्वरूपात पार पडला.शिरोळ नगरपरिषद आणि डॉ.अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी चौकात झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.या सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार डॉ.विनय कोरे हे अध्यक्षस्थानी होते.कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
सामाजिक मूल्यांचा सन्मान हीच खरी प्रेरणा – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले बोलताना पुढे म्हणाले की, माझे वडील छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्यासमवेत आ. अशोकराव माने यांनी सार्वजनिक जीवनात काम केले आहे. त्यांनी प्रामाणिकपणे जनसेवेचे व्रत स्वीकारून विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमठविला आहे. त्यांच्यावर शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातून जनतेने भरभरून प्रेम केले आहे. जयसिंगराव पाटील यांनी पोलीस दलात निस्वार्थी सेवा बजावून देशाचे रक्षण केले. रस्त्यावरची लढाई करून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खंडेराव जगदाळे यांनी परिश्रम घेतले.छत्रपती शिवाजी महाराज,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास तरुणांच्या मनात पोहोचविण्यासाठी प्रवीण चुडमुंगे यांनी प्रयत्न केले.समाजात चांगले कार्य करणाऱ्या अशा मान्यवरांना शिरोळभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याला सदिच्छा देण्याचा आदर्शवत उपक्रम या ठिकाणी राबविला जातो याचा अभिमान आहे. सहकार आणि साखर कारखाना क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व म्हणून आमदार विनय कोरे यांच्याकडे पाहिले जाते. ते आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करीत राहतात त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सार्वजनिक जीवनात कार्य करण्याचे बळ मिळते. असेही ते शेवटी म्हणाले.
शिरोळकरांची एकजूट आदर्शवत – आम. डॉ.विनय कोरे
समारंभाचे अध्यक्ष आणि आमदार डॉ.विनय कोरे बोलताना म्हणाले की, मिळालेला कर्मयोग समाजासाठी सार्थकी लावणाऱ्या तीन मान्यवर व्यक्तींना आज शिरोळकरांनी शिरोळ भूषण पुरस्कार देऊन वेगळेपण जपले आहे. या माध्यमातून राष्ट्र सेवेचे व्रत जोपासण्याचे काम झाले आहे. चांगल्या कामाची ओळख समाजासमोर ठेवून समाजाकडून चांगल्या कामाची अपेक्षा ठेवण्यासाठी असे सोहळे आयोजित करणे काळाची गरज आहे. चांगल्या कार्यासाठी राजकीय जोडे मतभेद, मनभेद बाजूला ठेवून शिरोळकर एकत्र येतात याचा आदर्श घेण्यासारखा आहे. शिरोळकरांनी दिलेल्या पाठबळावरच सार्वजनिक आणि राजकीय जीवनात आ.दलित मित्र डॉ. अशोकराव माने हे यशस्वी झाले आहेत.तिन्ही पुरस्कारार्थी मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजासमोर आपले प्रेरणादायी अस्तित्व ठेवले आहे. अशा मान्यवरांचा सत्कार करण्याची संधी आम्हा कार्यकर्त्यांना मिळाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो. चांगलं केलं की चांगलं घडतं हे शिरोळकरांनी दाखवून दिले आहे.
बापूंच्या कार्याची गौरवपूर्ण ओळख – खासदार धैर्यशील माने
खासदार धैर्यशील माने म्हणाले की केलेल्या कार्याचा सन्मान आणि पुढच्या कार्याला सदिच्छा देण्यासाठी शिरोळ भूषण पुरस्कार मान्यवर व्यक्तींना आज देण्यात आला. तिन्ही पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपल्या कार्यातून समाजाला प्रेरणा दिली आहे. आमदार दलित मित्र डॉ.अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त हा पुरस्कार वितरण सोहळा प्रत्येक वर्षी होतो. बापूंच्या प्रेमापोटी प्रत्येक वर्षी शिरोळकर एकत्र येऊन चांगला सोहळा आयोजित करतात. जनतेने बापूंच्यावर नेहमीच प्रेम केले आहे. त्यांना आशीर्वाद दिला आहे. या जोरावरच सार्वजनिक आणि राजकीय जीवनात तरुणांना लाजवेल असे कार्य बापूंच्या हातून घडत आहे.
शिरोळ भूषण पुरस्कार वितरणाचा शिरोळ येथे भव्य सोहळा
हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉ अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोळ नगरपरिषद आणि आमदार दलित मित्र डॉ.अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान आयोजित शिरोळभूषण पुरस्कार वितरण सोहळा येथील छत्रपती शिवाजी चौकात उत्साहात संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पुरस्कार वितरण समितीकडून उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी स्वागत केले.पुरस्कार वितरण समितीचे स्वागताध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी प्रास्ताविक केले.डॉ.अशोकराव माने आणि सौ.रेखादेवी माने यांचा वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
समाजसेवेतील योगदानाचा गौरव
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या कार्याचा गौरव केला.डबल राष्ट्रपती पदक प्राप्त सेवानिवृत्त पोलीस उपाधिक्षक जयसिंगराव पाटील यांनी पोलीस सेवेत निस्वार्थीपणे देशसेवा बजावली.त्यांच्या कार्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची मजबूत पायाभरणी झाली.तर शिक्षक नेते,खंडेराव जगदाळे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आणि शिक्षण क्षेत्रात न्याय मिळवण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न केले. त्याबद्दल मानाचा फेटा शाल मानपत्र सन्मानचिन्ह रोख रक्कम देऊन शिरोळ भूषण पुरस्कार देण्यात आला.तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्य करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शिरोळ तालुका कार्याध्यक्ष प्रवीण चुडमुंगे यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
शिरोळ भूषण पुरस्कार – समाजासाठी प्रेरणादायी परंपरा
या कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की,शिरोळ भूषण पुरस्कार ही केवळ सन्मानाची परंपरा नसून ती समाजातील चांगल्या कार्याला प्रोत्साहन देणारी चळवळ आहे.या माध्यमातून तरुण पिढीला प्रेरणा मिळते आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक मजबूत होते. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते,असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.
सहकार व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास अनेक राजकीय, सामाजिक आणि सहकारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यामध्ये आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे, माजी आमदार उल्हास पाटील, भगवान साळुंखे, दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, दरगू गावडे, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, पंचगंगा कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रताप उर्फ बाबा पाटील, जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण सभापती सौ. शीतल यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, नगरसेविका सौ. सविता पुजारी, सौ. दिपाली फल्ले, सौ. अनुराधा गुरव,रणजितसिंह पाटील, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, शिवाजीराव माने देशमुख, डॉ अरविंद माने, डॉ.नीता माने, सौ. सारिका माने, सिद्धनाथ महाराज, सुभाषसिंग रजपूत,संदीप कारंडे, प्रवीण यादव, एस. आर. पाटील, विजयसिंह माने देशमुख, सुहास राजमाने, सागर कोळी, बबन बन्ने, गुरुदत्त देसाई, शिरोळ भूषण धनाजी पाटील नरदेकर, बजरंग काळे, दिलीपराव माने, दादासो कोळी, संभाजी भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शिरोळ परिसरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगत
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर आबास कला अकॅडमी, कोल्हापूर यांच्या वतीने ‘राजा शिवछत्रपती’ हे ऐतिहासिक महानाट्य सादर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या महानाट्याला प्रेक्षकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.या सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले आणि कार्यक्रमाचा समारोप अत्यंत प्रेरणादायी वातावरणात झाला.
शिरोळकरांची एकजूट आणि विकासाचा संदेश
या संपूर्ण सोहळ्यातून शिरोळकरांची एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि विकासासाठी असलेली कटिबद्धता स्पष्टपणे दिसून आली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून समाजासाठी एकत्र येण्याची परंपरा या कार्यक्रमाने पुन्हा अधोरेखित केली.शिरोळ भूषण पुरस्कार हा केवळ सन्मान नसून समाजातील सकारात्मक कार्याला दिलेला सलाम असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.आमदार डॉ.अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिरोळ भूषण पुरस्कार सोहळा हा केवळ एक कार्यक्रम न राहता सामाजिक एकतेचा,प्रेरणेचा आणि चांगल्या कार्याचा उत्सव ठरला. मान्यवरांच्या उपस्थितीने आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा सोहळा संस्मरणीय बनला. शिरोळकरांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, चांगल्या कार्यासाठी समाज एकत्र येतो तेव्हा विकास आणि प्रेरणेचा नवा अध्याय लिहिला जातो.