बिरदेव नगरात भुयारी गटर व रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिव-शाहू विकास आघाडी प्रणित यादव पॅनेल कटिबद्ध असून शासनाच्या विविध योजनांमधून शहरात सुमारे १२ कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागणार आहेत,अशी माहिती उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी दिली. शहरात पारदर्शक,लोकाभिमुख आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्यासाठी नागरिकांनी यादव पॅनेलवर विश्वास दाखवला असून तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.प्रभाग क्रमांक ६ मधील बिरदेव नगर येथे अण्णा पुजारी ते सखाराम पुजारी यांच्या घरापर्यंत भुयारी गटर व रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचगंगा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रताप उर्फ बाबा पाटील होते. यावेळी उद्योजक संजीव पुजारी, शाहू वाचनालयाचे संचालक आनंदराव माने-देशमुख, नगराध्यक्षा योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव तसेच नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव म्हणाले की, शहरातील मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत असून रस्ते, गटर्स, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरी सुविधा यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आगामी काळात शहरातील प्रत्येक प्रभागात विकासकामांचा वेग वाढविण्यात येईल. शासनाच्या विविध योजनांमधून निधी खेचून आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.आघाडीचे नेते प्रताप उर्फ बाबा पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिव-शाहू विकास आघाडी प्रणित यादव पॅनेलची सत्ता आल्यानंतर बिरदेव नगरात सुरू होणारे हे पहिले महत्त्वाचे विकासकाम आहे. जनतेने दाखविलेल्या विश्वासाला पात्र राहून शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार आघाडीने केला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.उपनगराध्यक्ष यादव यांनी आपल्या मनोगतात शहरात सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. विविध योजनांमधून मिळणाऱ्या निधीच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम करण्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आघाडीतील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे विकासाची गती अधिक वाढेल, असेही ते म्हणाले.कार्यक्रमाच्या प्रारंभी आनंद पुजारी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.वनिता पुजारी यांनी केले.बिरदेव नगरातील या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात शहरातील इतर भागांमध्येही अशाच पद्धतीने विकासकामांना गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यावेळी नगरसेवक विजय आरगे, उल्हास आवळे,राहुल कोळी,ओंकार गावडे, सचिन शिंदे तसेच नगरसेविका कल्पना काळे, रेखा कोरे, सविता पुजारी, अनुराधा गुरव , पंडित काळे, अविनाश उर्फ पांडुरंग माने, अण्णा पुजारी, बाबुराव पुजारी, दत्तात्रय पुजारी, मारुती पुजारी, तातोबा पुजारी, लालासो पुजारी, सखाराम पुजारी, आकाराम पुजारी, राजेंद्र कांबळे, बबन पुजारी, संतोष बन्ने, कॉन्ट्रॅक्टर उदय संकपाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.