शिरोळ / प्रतिनिधी
राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शिरोळ येथील श्री दत्त उद्योग समूह यांना सदिच्छा भेट देत शेती, सहकार, सामाजिक विकास आणि ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा केली.यावेळी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. बैठकीत विशेषतः शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या “क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पा”वर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.क्षारयुक्त व नापीक होत चाललेल्या जमिनी पुन्हा सुपीक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, प्रभावी पाणी व्यवस्थापन, मृदा संवर्धन आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.या प्रकल्पाच्या माध्यमातून शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.मंत्री हसन मुश्रीफ यांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून समाजहिताचे विविध उपक्रम राबविणाऱ्या गणपतराव पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले.उद्योग, शेती आणि सहकार यांचा समन्वय साधल्यास समाजाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळू शकते,असे मत त्यांनी व्यक्त केले.ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती, शाश्वत विकास आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अशा विकासाभिमुख प्रकल्पांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.दरम्यान ग्रामीण भागातील विकासासाठी अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शेतकरी,कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी सहकार आणि विकासाचा समतोल साधणे ही काळाची गरज असल्याचे मत मंत्री मुश्रीफ व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, आदिल फरास,संचालक शेखर पाटील, कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील,परवेज मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.