‘दर’ ठरल्यानंतर काम पुन्हा सुरू होण्याचा अंदाज, टक्केवारीच्या वादात पाणीपुरवठा योजना व शिरोळची विकासकामे रखडली की काय ? शहरात चर्चा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ शहरासाठी मोठ्या प्रयत्नांनंतर मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना सध्या ठप्प अवस्थेत असून,या योजनेच्या बंद पडण्यामागे टक्केवारीचा वाद कारणीभूत असल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.संबंधितांचा हिस्सा निश्चित झाल्यानंतरच योजना पुन्हा सुरू होईल, असा अंदाज नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

शिरोळ शहरातील काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की,नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.कारण सध्याच्या योजनेचे ३० ते ४० टक्के काम पूर्ण झालेले आहे.त्यामुळे विद्यमान योजनेलाच पुढे नेणे अपरिहार्य ठरणार असून, त्याच ठेकेदारामार्फत काम पूर्ण करून घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त होत आहे.दरम्यान, योजना जास्त काळ रखडल्यास कुरुंदवाड शहरातील प्रकल्पांप्रमाणे ही योजना देखील कायमची अडकण्याची भीती व्यक्त होत आहे.त्यामुळे “टक्केवारीचा दर” निश्चित झाल्यानंतर बंद पडलेली विकासकामे पुन्हा गती घेतील,अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.याआधी ज्यांच्यावर आरोप करण्यात आले, त्याच मुख्याधिकाऱ्यांबरोबर आता संबंधितांना काम करावे लागत असल्याने आरोपांचा विषय मागे पडल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. “आतून सगळे मिटले असून फक्त व्यवहार बाकी आहे,” अशी टीका काही नागरिकांनी केली.पत्रकारांनी “शहराची पाणीपुरवठा योजना नेमकी कधी सुरू होणार?” असा सवाल उपस्थित केला असता, काही नागरिकांनी उपरोधिक प्रतिक्रिया देत,“वाढपी बदलला की ताटातील खीर चाखणारच,”असे म्हणत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.“सगळेच चोर एकाच माळेचे मणी आहेत,”अशी संतप्त भावना देखील व्यक्त करण्यात आली.दरम्यान, जयसिंगपूरप्रमाणेच येथेही संबंधितांना योग्य हिस्सा दिल्यास शिरोळची बंद पडलेली पाणीपुरवठा योजना लवकरच पुन्हा सुरू होईल, अशी चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!